आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरावानंतर तीन दिवसांची विश्रांती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ - विदेशी जमिनीवर सलग सात पराभव स्वीकारणा-या टीम इंडियाने मंगळवारी सकाळी तीन तास वाकाच्या खेळपट्टीवर सराव केला. सरावानंतर लगेचच टीम इंडियाचे खेळाडू तीन दिवस विश्रांती घेणार आहेत. यामुळे पुढचे तीन दिवस कोणताही सराव होणार नाही, अशी घोषणा संघ व्यवस्थापनाने केली. खेळाडू खूप थकले असल्याचे कारण या वेळी संघ व्यवस्थापनाने सांगितले.
सलग पराभवानंतर कसून सराव करण्याऐवजी टीम इंडिया विश्रांतीवर जोर देत असल्याचे आज दिसून आले. संघ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार चौथ्या कसोटीला 24 जानेवारी अ‍ॅडिलेड येथे प्रारंभ होणार असून, आता टीम इंडिया या सामन्यापूर्वी थेट शनिवारीच सरावाला सुरुवात करणार आहे. भारतीय संघाचे खेळाडू आज सकाळी लवकरच दोन गटांत सरावासाठी मैदानावर आले.
राहुल द्रविडसह काही खेळाडूंनी फार गांभीर्याने सराव केला. मात्र, चौथ्या कसोटीसाठी कर्णधार बनलेला सेहवाग शांत दिसला. सरावानंतर संघाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘24 जानेवारी रोजी होणा-या कसोटीसाठी संघ बुधवारी अ‍ॅडिलेडला रवाना होणार आहे.’ तेथे शुक्रवारपर्यंत विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी सरावाला प्रारंभ केला जाणार आहे.
द्रविड, कोहलीने घाम गाळला
जवळपास सकाळी 10 वाजता वाकाच्या मैदानावर पोहोचल्यानंतर भारतीय संघातील राहुल द्रविड आणि युवा खेळाडू विराट कोहली यांनी पूर्ण एकाग्रतेने काही कठीण फटक्यांचा कसून सराव केला. त्यांच्यासोबत फिरकीपटू प्रज्ञान ओझा आणि वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनसुद्धा होते.
दुस-या टप्प्यात सचिन, धोनीचा सराव
एका तासानंतर दुस-या टप्प्यात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सेहवाग आणि ईशांत शर्मा, विनयकुमार, आर. अश्विन सरावासाठी मैदानावर आले. सेहवागने पॅड न बांधता स्लो चेंडूवर सराव केला.
रोहितवर लक्ष
प्रशिक्षक फ्लेचर यांनी या वेळी युवा फलंदाज रोहित शर्माच्या सरावावर विशेष लक्ष दिले. रोहितला या दौ-यावर अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही.
पुन्हा बोल्ड नाही
कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी 54 वेळा त्रिफळाचीत झाल्यानंतर राहुल द्रविडने प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या सल्ल्यानुसार संरक्षणाच्या तंत्राचा कसून सराव केला. द्रविडने जवळपास दोन तास घाम गाळला.