आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकपची जादू ओसरली, भारतीय संघाने गमावलेला सूर कारणीभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बांद्र्याचे रहिवासी ४८ वर्षीय विकास मदनानी यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये आयोजित विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पाहण्याचा बेत त्यांनी आखला होता. मात्र मुलांच्या परीक्षा आडव्या आल्यामुळे आता ते घरीच सामने पाहणार आहेत. मैदानावर प्रत्यक्ष सामना पाहण्याची भूक टीव्हीवर सामने पाहून भागवणारे मदनानी यांच्यासारखे अनेक आहेत. भारतीय संघाची सध्याची गचाळ कामगिरी, फेब्रुवारी-मार्चमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये असलेला हिवाळा यामुळे वर्ल्डकप प्रत्यक्ष पाहण्याच्या क्रेझला लगाम बसला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत २० ते ५० टक्केच चाहते वर्ल्डकप पाहण्यासाठी जात आहेत. टूर ऑपरेटर्सना मात्र यापेक्षा तिप्पट प्रवासी मिळतील, अशी अपेक्षा होती.

"मेक मायट्रिप'चे हॉलिडे हेड रणजित ओक यांच्यानुसार, विश्वचषकाचे सामने पर्यटनस्थळांच्या जवळ आहेत. फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियात जाणार्‍या पर्यटकांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. "आयसीसी वर्ल्डकप २०१५' चे अधिकृत ट्रॅव्हल एजंट "कटिंग एज इव्हेंट्स'चे व्यवस्थापकीय संचालक मयंक खांडवाल म्हणाले, दररोज १०० जण चौकशी करतात. मात्र ४-५ तिकिटेच बुक होतात. यातील १०-१२ चौकशा न्यूझीलंडसाठी, तर उर्वरित ऑस्ट्रेलियासाठी असतात. भारताचे सर्व प्रतिष्ठित सामने ऑस्ट्रेलियात असल्याने क्रिकेटप्रेमींचा तिकडेच ओढा आहे. १५ फेब्रुवारीला अ‍ॅडिलेडमधील भारत-पाक लढतीसाठी ३ रात्री व ४ दिवसांचे पॅकेज मॅचच्या तिकिटासह ७२,५०० रुपयांत देत असल्याचे त्यांनी सांगितले.

"टुरिस्ट ऑस्ट्रेलिया'चे इंडिया-गल्फ कंट्री मॅनेजर निशांत काशीकर यांच्यानुसार ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडने भारतीयांसाठी कॉमन व्हिसा दिला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ट्रॅव्हल्स आणि टूर ऑपरेटर कंपन्या पॅकेजच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. कॉक्स अँड किंग्जच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख आनंद म्हणाले, सर्वाधिक चौकशी २५ ते ४५ वयोगटातील लोकांनी केली आहे. आम्ही १५ दिवस आणि १४ रात्रीच्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडसाठीचे पॅकेज २.२० लाख देत आहोत. वेगवेगळी ठिकाणे व दिवसानुसार ३६ हजार रुपयांतही पॅकेज उपलब्ध आहे. ट्रॅव्हल्स एजंट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (टाय) सरचिटणीस जनरल हरमनदीपसिंग आनंद यांच्यानुसार, महानगरांतून विचारणा होते, मात्र लहान शहरांमधून अल्प प्रतिसाद आहे. पहिल्या फेरीनंतर लोकांचा कल वाढू शकतो. एक लाख रुपयांपासून अडीच लाख रुपयांच्या पॅकेजची मागणी सर्वाधिक आहे.

दिल्लीमध्ये धनपती ट्रॅव्हल्सचे नीरज मल्होत्रा म्हणाले, विश्वचषकाबाबत खूप अपेक्षा होती. मात्र, परीक्षा व थंडीमुळे अपेक्षित प्रतिसाद नाही. बहुतांश लोक एप्रिल ते जूनदरम्यान ऑस्ट्रेलिया पसंत करतात. शिवाय टीम इंडियाची निराशाजनक कामगिरीही कारणीभूत आहे. "ट्रिप फॅक्ट्री" बंगळुरूचे सीओओ अमित अग्रवाल म्हणतात, सर्वाधिक मागणी नऊ ते ११ दिवस-रात्र आणि तीन किंवा त्यापेक्षा जास्त शहरांच्या पॅकेजसाठी आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी हॉटेल्स बुक
- भारत-पाक सामन्यासाठी अ‍ॅडिलेडची सर्व हॉटेल्स बुक, सामना पाहण्यासाठी चार तासांचा प्रवास करावा लागेल
- २६ जानेवारीपासून ५ एप्रिलपर्यंत ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचा कॉमन व्हिसा. त्यानंतर पेनॉल्टी
- ट्रॅव्हल्स एजंट्सना तिप्पट आशा होती, मात्र आतापर्यंत फक्त ५० टक्के वाढ
- २५ ते ४५ वयोगटातील नागरिकांचा सर्वाधिक उत्साह, ६००० क्रिकेटप्रेमी भारतातून ऑस्ट्रेलियात जाण्याची आशा.
- ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत न्यूझीलंडला जाण्यासाठी १० टक्केच होते चौकशी
- भारतातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्टीफन फ्लेमिंग यांनी केली प्रचार मोहीम.

‘दिव्य मराठी’शी बोलले ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचे अधिकारी
- पर्यटनासाठी सकारात्मक सुरुवात कॉमन व्हिसातून झाली. पाच ते सहा हजार प्रेक्षक पोहोचण्याची आशा आहे.
निशांत काशीकर, कंट्री मॅनेजर, टुरिस्ट ऑस्ट्रेलिया

- न्यूझीलंडला जाणार्‍यांत डिसेंबर २०१४ पासून २१ टक्के वाढ राहिली. वर्ल्डकपदरम्यान यात आणखी वाढ होईल.
स्टीव्हन डिक्सन, रिजनल मॅनेजर, साऊथ-ईस्ट एशिया टुरिझम, न्यूझीलंड