आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटचा महानायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकर अर्थात क्रिकेटचा देव रिटायर होतो आहे, हे ऐकूनच माझे मन सुन्न झाले होते. ही बातमी कानी पडल्यानंतर मी अस्वस्थ झालो. आमच्या पिढीला सचिनशिवाय क्रिकेट पाहण्याची सवयच नाही. आता सचिनशिवाय क्रिकेट बघावे लागेल. सचिनशिवाय क्रिकेट म्हणजे सुगंध नसलेले अत्तर असेच असेल.
सचिन सर्वाथाने महान व्यक्ती आहे. तो खेळाडू म्हणून ग्रेट आहेच, शिवाय माणूस म्हणूनही तो श्रेष्ठ आहे. मला याची प्रचिती अनेक वेळा आली. मी सचिनला ब-याच वेळा भेटलो. पुरस्कार वितरण सोहळ्यात दोन ते तीन वेळा आमची भेट झाली. यानंतर इतर काही कार्यक्रमातही आम्ही भेटलो. आमची जेव्हा केव्हा भेट झाली, त्या प्रत्येक वेळी मला सचिनने प्रेरित केले. ‘तू देशासाठी असाच खेळत राहा आणि अधिकाधिक पदके जिंकून भारताचा तिरंगा जगभर फडकव,’ अशा शुभेच्छा त्याने नेहमी दिल्या. सचिनने फक्त मला एकट्यालाच प्रेरित केले नाही तर लाखो युवकांना प्रेरणा दिली. तो फक्त क्रिकेट विश्वाचा नायक नाही, तर भारतीय क्रीडा जगताचा महानायक आहे, असे मी म्हणेन. किंबहुना तो क्रिकेटचा ‘देव’ आहे, असे मीसुद्धा म्हणतो. मीसुद्धा सचिनचा फॅन आहे. सचिनची नजाकत असलेली फलंदाजी पाहणे कोणाला आवडणार नाही ?.. जो-तो सचिनचा चाहता आहे. वयोवृद्धापासून ते बालकापर्यंत प्रत्येकाला सचिन आवडतो. सचिन आहेच असा.
मी सचिनला भेटलो त्या प्रत्येक वेळी तो मला अत्यंत नम्र, शांत आणि संयमी दिसला. त्याच्या मोठेपणाचे हे गुण असल्याचे मला समजले. हे गुण अंगीकारण्याचे मीसुद्धा प्रयत्न करतो आहे. सचिन अनेकांना न भेटतासुद्धा त्याच्या समर्पणाने, फलंदाजीने प्रेरित करतो. हे मी स्वत: अनुभवले आहे. सचिनच्या निवृत्तीमुळे आपल्या क्रीडा विश्वात एक मोठी पोकळी निर्माण होईल. तो खेळाशिवाय जगूच शकत नाही. यामुळे सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतरही खेळाशी जोडलेला राहील, असा माझा विश्वास आहे.
पदक जिंकल्यानंतर पहिला फोन सचिनचा
माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाचा क्षण कोणता, असे विचाराल तर लंडन ऑलिम्पिकमध्ये मी रौप्यपदक जिंकल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत सचिनचा मला अभिनंदन करणारा फोन आला. सचिनचा थेट लंडनला फोन आला आहे, यावर क्षणभर माझाच विश्वास बसला नाही. मात्र, दुस-या टोकाने फोनवरून साक्षात सचिन तेंडुलकर होता. सचिनने माझे मनभरून कौतुक केले. पदक जिंकल्याचा माझा आनंद द्विगुणित झाला. पदक जिंकल्यानंतर मला अनेकांचे फोन आले. अनेकांनी माझे कौतुक केले. मात्र, पहिला फोन आला तो सचिनचाच. सचिनने माझा सामना बघितला होता. ‘सामना बघितल्यानंतर माझ्या अंगावर शहारे आले. तू पदक जिंकून कोट्यवधी भारतीयांना आनंदाचा क्षण दिला आहेस. तुझे कोटी कोटी अभिनंदन. असाचा खेळ, असाच लढ..’ असे सचिनने मला त्या वेळी म्हटले होते. पदक जिंकल्यानंतर मला अनेकांचे फोन आले. मात्र, सचिनच्या फोनमुळे माझ्यात आणखी नवी ऊर्जा निर्माण झाली. आपल्यातही काहीतरी वेगळे करण्याची शक्ती आहे, असे मला वाटू लागले.
(बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य, तर लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता)
शब्दांकन : राजेश शर्मा