नवी दिल्ली - नेमबाजीतील यशासाठी मला प्रदीर्घकाळ वाट पाहावी लागत नाही. मात्र हरियाणा राज्य शासनाने जाहीर केलेल्या नोकरीची गेल्या तीन वर्षांपासून मला प्रतीक्षा असल्याचे प्रख्यात नेमबाज अनिसा सय्यदने सांगितले.
तीन वर्षांपासून वाट पाहून दमलेल्या अनिसा सय्यदने अखेर तिची निराशा शब्दांत व्यक्त केली. नुकत्याच संपलेल्या कॉमनवेल्थमध्ये अनिसाने रौप्यपदक पटकावत पुन्हा देशाच्या पदक तालिकेत मोलाची भर घातली. त्या पार्श्वभूमीवर भारतात परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तिने स्वत:च्या भावना व्यक्त केल्या. तीन वर्षे उलटूनही मला कबूल करण्यात आलेली नोकरी देण्यात आलेली नाही. जर त्या नोकरीसाठी मी पात्र नाही, असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी मला तसे कळवायला हवे होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर झगडणार्या खेळाडूला अशा प्रकारे अंधारात ठेवणे योग्य वाटत नाही, असेही अनिसाने नमूद केले. अनिसाने 25 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यमिळवून दिले.