आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CWG: Parupalli Kashyap Wins Men\'s Singles Gold, Latest News In Marathi

CWG : बॅडमिंटनमध्ये कश्यपला ऐतिहासिक सुवर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - भारताच्या परुपल्ली कश्यपने ऐतिहासिक कामगिरी करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटन प्रकारात पुरुष एकेरीचे सुवर्णपदक जिंकले. हृदयाचे ठोके चुकतील इतक्या संघर्षपूर्ण सामन्यात कश्यपने सिंगापूरच्या डॅरेक वोंगला रविवारी हरवले. भारताने कश्यपच्या बळावर तब्बल 32 वर्षांनंतर ऐतिहासिक विजय मिळवला. कश्यपने फायनलमध्ये 21-14, 11-21, 21-19 ने विजय मिळवला. यापूर्वी 1982 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या सय्यद मोदी यांनी सुवर्णपदक जिंकले होते.

ग्लासगो स्पर्धेत बॅडमिंटन प्रकारात भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. सुवर्णपदकाच्या लढतीत कश्यपने पहिला गेम अत्यंत सहजपणे जिंकला. मात्र, दुसर्‍या गेममध्ये त्याचा पराभव झाला. निर्णायक आणि अखेरच्या गेममध्ये कश्यपने जबरदस्त पुनरागमन केले. अखेरच्या गेममध्ये त्याने एकेक गुण मिळवत संघर्षानंतर रोमांचक विजय मिळवला. कश्यपने हा सामना 56 मिनिटांत जिंकला.

रोमांचक सामना : कश्यपने पहिला गेम सहजपणे 15 मिनिटांत 21-14 ने जिंकला. मात्र, दुसर्‍या गेममध्ये वोंगने शानदार पुनरागमन करताना 17 मिनिटांत 21-11 ने बाजी मारली. निर्णायक गेममध्ये वोंगने पुन्हा चांगली सुरुवात करताना 8-6 अशी आघाडी घेतली होती. कश्यपने पुन्हा स्कोअर 8-8 असा केला. मात्र, वोंगने 12-8 अशी आघाडी घेतली. कधी कश्यप पुढे, तर कधी वोंगची आघाडी, असा रोमांचक खेळ सुरू होता. प्रत्येक पॉइंटनंतर रोमांच वाढत होता. दोन्ही खेळाडू एकेक गुण मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते.

कश्यपने वोंगच्या चुकांचा फायदा घेताना 19-16 अशी आघाडी घेतली. मात्र, वोंगने पुन्हा 19-19 असा स्कोअर करून वातावरण गंभीर केले. कोण सुवर्णपदक जिंकेल, हे सांगता येणे कठीण होत होते. निर्णायक क्षणी विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेता कश्यपचा अनुभव अखेर कामी आला. वोंगच्या दोन चुकांनी कश्यपला चॅम्पियन बनवले. कश्यपने अखेरच्या क्षणी संयम दाखवताना वोंगला चुका करण्यास भाग पाडले. भारताला चार वर्षांपूर्वी दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये सायना नेहवालने महिला एकेरीचे सुवर्णपदक मिळवून दिले होते.
ज्वाला-अश्विनीला रौप्य
बॅडमिंटनच्या महिला दुहेरीत भारताला सुवर्णपदकाची आशा होती. मात्र, फायनलमध्ये भारताची ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांचा मलेशियन जोडी व्ही.के. हू आणि केडब्ल्यू हुन यांच्याकडून पराभव झाला. मलेशियन जोडीने भारताला 21-17, 23-21 ने हरवले. हा सामना रोमांचक झाला. दुसर्‍या गेममध्ये भारतीय खेळाडूंनी विजय मिळवण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. ज्वाला-अश्विनीच्या जोडीने फायनलपर्यंंत दमदार प्रदर्शन केले. फायनलमध्ये त्यांना स्टेडियममध्ये चाहत्यांचे जोरदार समर्थन मिळाले. मात्र, मलेशियन जोडीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्‍यानची कश्‍यपची छायाचित्रे..