ग्लासगो - सीमा पुनियाने राष्ट्रकुल स्पर्धेच्या अॅथलेटिक्स प्रकारात भारताला रौप्यच्या रूपाने दुसरे पदक मिळवून दिले. तिने शुक्रवारी रात्री थाळीफेक प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. यापूर्वी विकास गौडाने भारताला थाळीफेकमध्ये सुवर्ण मिळवून दिले. भारताच्या सीमाने अंतिम फेरीत 61.61 मीटर थाळीफेक करून दुसर्या स्थानी धडक मारली. दुसरीकडे पिंकी राणीने शुक्रवारी भारतीय संघाला बॉक्सिंग प्रकारात पदकाचा श्रीगणेशा करून दिला. तिने महिलांच्या 48 किलो वजन गटात कांस्यपदकाची कमाई केली. स्पर्धेत भारतीय संघाचे बॉक्सिंगमधील हे पहिले पदक ठरले. आता भारताच्या नावे एकूण 15 कांस्यपदके झाली आहेत. पदक तालिकेत भारत 49 पदकांसह पाचव्या स्थानावर कायम आहे.
भारताच्या पिंकी राणीला आयर्लंडच्या मिशेला वॉल्शविरुद्ध उपांत्य लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, यातील पराभवासह तिचे कांस्यपदक निश्चित झाले. आयर्लंडच्या खेळाडूने 2-0 ने हा सामना जिंकला. लढतीत वॉल्शला रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, तिचा प्रयत्न अपयशी ठरला. तिने पहिल्या फेरीत तोडीस तोड खेळी करताना 38-38 ने बरोबरी साधली होती. मात्र, दुसर्या फेरीत वाल्शने चार गुणांच्या आघाडीने बाजी मारली. तिने या फेरीत 40-36 ने विजय मिळवून आघाडी घेतली. निर्णायक तिसर्या फेरीत वाल्शने 39-37 ने बाजी मारली.
एल. देवीला ‘सुवर्ण’ संधी!
भारताची स्टार बॉक्सर लैशराम सरिता देवीने शुक्रवारी रात्री महिलांच्या 57-60 किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. यासह तिने रौप्यपदक निश्चित केले. भारताचे हे बॉक्सिंगमधील पहिले रौप्य ठरेल. भारताच्या खेळाडूने उपांत्य लढतीत मोझाबक्युईच्या मारियावर 3-0 अशा फरकाने विजय मिळवला.