बंगळुरू - भारत आणि सर्बियात आजपासून डेव्हिस चषक टेनिसचा रोमांच सुरू होणार आहे. नोवाक योकोविक खेळणार नसल्याने भारतीय संघ तरुण सर्बियन संघावर बढत घ्यायच्या इराद्याने उतरेल. भारतीय संघात
लिएंडर पेस,
रोहन बोपन्ना, युकी भांबरी आणि
सोमदेव देवबर्मनचा समावेश आहे. सामन्यांची सोडत गुरुवारी काढण्यात आली.
अनुभवी लिएंडर पेसच्या समावेशामुळे भारताची जागतिक गटातील दावेदारी मजबूत झाली आहे. योकोविक नसण्याचा भारतीय संघाला निश्चितच फायदा होणार आहे. २०१० चा विजेता असलेल्या सर्बियावर योकोविकच्या बाहेर पडण्यामुळे जागतिक गटातून गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवू शकते. २००७ मध्ये जागतिक गटात स्थान मिळवणारा सर्बिया १६ संघ असलेल्या या गटात सातत्याने खेळत आहे.
२४ वर्षीय दुसान लाजोविच (आंतरराष्ट्रीय क्रमवारीत ६१ वा) एकेरीतील सर्बियाचा क्रमांक एकचा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रमवारीत १०७ व्या क्रमांकावर असलेला फिलिप क्राजोनिविच, १७१ व्या क्रमांकावरील इलिजा बोजोलाक आणि दुहेरीचा नेनाद जिमोनजिचचा सर्बियन संघात समावेश आहे.
दुहेरीचा सामना शनिवारी
लिएंडर पेस-रोहन बोपन्नाचा सामना शनिवारी इलिजा बोजोलाक-नेनाद जिमोनजिचशी होणार आहे. रविवारी पहिल्या एकेरी सामन्यात सोमदेवचा सामना लाजोविचशी तर अंतिम सामना युकी भांबरी-क्राजिनोविचमध्ये होणार आहे.