बंगळुरू - मुसळधार पावसामुळे रविवारी अर्ध्यावर थांबलेला डेव्हिस चषकातील भारताचा युकी भांबरी आणि सर्बियाचा फिलिप क्राजिनोविक यांच्यातील सामना सोमवारी पुन्हा सुरू झाला. या वेळी सर्वांची नजर भारताचा युवा खेळाडू युकीवर होती. त्याच्या शानदार विजयासह भारताला डेव्हिस चषकाच्या वर्ल्ड ग्रुपमधील
आपला प्रवेश निश्चित करण्याची संधी होती.
मात्र, युकीला धक्कादायक विजयाची नोंद करता आली नाही. परिणामी भारताच्या जगातील अव्वल १६ संघांमध्ये स्थान मिळवण्याच्या आशेवर पाणी फेरले गेले. त्यामुळे आता पुन्हा भारताला आशिया आेसानिया ग्रुपमध्ये खेळावे लागेल.
दमदार सुरुवात करताना सर्बियाने लढतीच्या पहिल्या दिवशी २-० ने मजबूत आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या आणि तिसऱ्या दविशी दमदार पुनरागमनासह लढतीत २-२ ने बरोबरी साधली होती. दुहेरीत राेहन बाेपन्ना-
लिएंडर पेस आणि एकेरीत साेमदेवने विजय मिळवून भारताला बरोबरी मिळवून दिली होती.
मात्र, त्यानंतर युकी आणि फिलिप यांच्यातील एकेरीच्या सामन्यात रविवारी पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे सामना अर्ध्यावर थांबवण्यात आला. या वेळी फिलिपने युकीविरुद्ध ६-३, ४-४ ने आघाडी मिळवली होती. त्यानंतर साेमवारी झालेल्या उर्वरित सामन्यात बाजी मारून फिलिपने विजय संपादन केला. दुपारी १२ वाजता या लढतीला सुरुवात झाली होती.
फिलिप विजयी
फिलिप क्राजिनोविकने पुरुष एकेरीच्या निर्णायक लढतीत युकीचा ६-३, ६-४, ६-४ अशा फरकाने सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. त्याने रविवारीच लढतीत ६-४, ४-४ ने आघाडी घेतली होती. या शानदार एकतर्फी विजयासह सर्बियाने वर्ल्ड ग्रुपमध्ये धडक मारली. पाहुण्या सर्बियाने साेमवारी यजमान भारतावर ३-२ ने मात केली.