आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्मशाला- भारताविरूद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाने टीम इंडियावर सात गडी आणि 16 चेंडू राखून विजय मिळवला. इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला शतकवीर इयान बेल. इयाने बेलने शानदार खेळी करत नाबाद 113 धावा केल्या. त्याला इयॉन मॉर्गनने चांगली साथ दिली. मॉर्गनेही 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या. कर्णधार कुक 22, ज्यो रूट 31 आणि केव्हीन पीटरसनने 6 धावा केल्या. टीम इंडियाकडून शमी अहमद, इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 विकेट मिळवल्या.
उल्लेखनीय म्हणजे बेलनेही एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या चार हजार धावा पूर्ण केल्या. या मालिकेत चार हजार धावा पूर्ण करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी हा टप्पा ओलंडला होता.
रैनाचा बहारदार खेळ त्याला जडेजाची मोलाची साथ
सुरेश रैनाचे अर्धशतक त्याला मिळालेली रवींद्र जडेजाची सुरेख साथ तसेच तळाचा फलंदाज भुवनेश्वर कुमार आणि आर अश्विन जोडीने केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाने 49.4 षटकात सर्वबाद 226 धावा केल्या. डावखु-या रैनाने 98 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 83 धावा केल्या. त्याला जडेजाने 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 39 धावा करीत चांगली साथ दिली. सलामीवीर गौतम गंभीर 24, कर्णधार धोनी 15, भुवनेश्वर कुमार 31 आणि आर अश्विनने 19 धावा केल्या. इंग्लंडकडून टीम ब्रेसनने सर्वाधिक 4 विकेट तर स्टीवन फीन - ट्रेडवेलने 2-2 तर समित पटेल आणि ख्रिस वोक्सने 1-1 विकेट घेतल्या.
इंग्लिश गोलंदाजांचा प्रभावी मारा
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा कर्णधार एलिस्टर कुकचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. स्विंग गोलंदाजी खेळताना टीम इंडिया अडचणीत येते हे आज पुन्हा एकदा दिसून आले. ब्रेसनन आणि फीन या द्वुतगती गोलंदाजांनी सुरूवातीलाच टीम इंडियाला धक्के दिले. मागील सामन्यातील अर्धशतकवीर रोहित शर्मा (4) आणि विराट कोहली याला शून्यावरच बाद केले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या युवराजकडून मोठया अपेक्षा करण्यात आल्या. मात्र, त्यालाही आपला भोपळा फोडता आला नाही. गौतम गंभीरने जम बसवला आहे असे वाटत असतानाच इयान बेलने पॉईंटला त्याचा अप्रितम झेल टिपला. गंभीरने 5 चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. एका बाजूने रैना पाय रोवून उभा होता. त्याला एकाही फलंदाजाची साथ मिळत नव्हती. धोनी आत्मविश्वासाने खेळत असतानाच पंचाच्या एका संशयास्पद निर्णयामुळे त्याला तंबूत परतावे लागले. फीनने त्याला पायचित केले. त्याने 15 धावा केल्या.
तळाच्या फलंदाजांची फटकेबाजी
धोनीनंतर आलेल्या रवींद्र जडेजाने रैनाला चांगली साथ दिली. त्यानेही काही आक्रमक फटके खेळली. शेवटी त्याला ट्रेडवेलने 39 धावांवर बाद केले. यामध्ये त्याने 2 षटकार आणि एक चौकार मारला. तळाचा फलंदाज भुवनेश्वर कुमारने आपण फलंदाजीतही काही कमी नसल्याचे दाखवून दिले. त्याने 5 चौकारांच्या मदतीने आक्रमक अशा 31 धावा केल्या. मात्र, बेसनने त्याचा अडथळा दूर केला.
दरम्यान सुरेश रैनाने 159 व्या एकदिवसीय सामन्यात आपल्या चार हजार तर रवींद्र जडेजाने 64 व्या सामन्यात एक हजार धावा पूर्ण केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.