दुबई -
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाला सर्वश्रेष्ठ ठरवताना आयसीसीने त्याला आयसीसीच्या वनडे संघाचा कर्णधार म्हणून नामांकित केले आहे. आयसीसीच्या १२ सदस्यीय संघात चार भारतीय, तीन आफ्रिकन, दोन ऑस्ट्रेलियन आणि पाक-श्रीलंकेचा प्रत्येकी एक खेळाडू आयसीसी संघात सामील आहे.
प्रख्यात लेगस्पिनर अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय समितीने कसोटी आणि एकदिवसीय संघाची निवड केली. त्यात आयसीसीच्या एकदिवसीय संघाचे कप्तानपद महेंद्रिसिंग धोनीकडे देण्यात आले आहे. त्याशिवाय
विराट कोहली आणि मोहंमद शमी या दोघांचा समावेश अकरा सदस्यांच्या संघात करण्यात आला आहे, तर रोहित शर्मा हा त्या एकदिवसीय संघाचा बारावा
राखीव खेळाडू आहे. मात्र, श्रीलंकन कप्तान अँजेलो मॅथ्यूजच्या नेतृत्वाखालील कसोटी संघामध्ये एकाही भारतीयाला प्रवेश मिळू शकलेला नाही. त्यात डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यम्सन, कुमार संगकारा, एबी डिव्हिलर्स, जो रुट, मिशेल जॉन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, डेल स्टेन, रंगना हेराथ, टीम साउथी आणि रॉस टेलर यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कसोटीत सुमार कामगिरीचा भारताला फटका बसला.
धोनी सलग सातव्या वर्षी संघात
२०१४ मधील कामगिरीच्या आधारावर वनडे संघासाठी धोनीला कर्णधार म्हणून नामांकित करण्यात आले आहे. विराट कोहली आणि मो. शमी यांनासुद्धा अकरा खेळाडूंत स्थान मिळाले आहे. रोहित शर्माला बारावा खेळाडू म्हणून नामांकित करण्यात आले. आयसीसीच्या वनडे संघात धोनीने सलग सातव्या वर्षी स्थान मिळवले आहे, हे विशेष.
कोहलीचे आयसीसीसाठी मानांकन
वर्षभरातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून मानांकन मिळाल्यानंतर पुन्हा एलजी आयसीसी २०१४ या पुरस्कारासाठी विराट कोहलीला मानांकन प्राप्त झाले आहे. कोहलीने यापूर्वी २०१२ मध्ये हा पुरस्कार प्राप्त केला आहे. या पुरस्कारासाठी त्याची लढत क्विंटन डी कॉक, अॅबी डिव्हिलर्स आणि डेल स्टेन यांच्याशी होत आहे. भारतीय महिला संघाची कप्तान मिथाली राज हिने सर्वश्रेष्ठ एकदिवसीय महिला क्रिकेटपटू आणि वर्षातील सर्वोत्कृष्ट टी -२० महिला क्रिकेटपटू अशा दोन्ही श्रेणींमध्ये मानांकन मिळवले आहे.
कसोटीची गचाळ कामगिरी भोवली
आयसीसीच्या कसोटी संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळाले नाही. इंग्लंडकडून कसोटीत १-३ आणि न्यूझीलंडकडून १-० पराभवामुळे समितीने एकाही भारतीय क्रिकेटपटूचा वर्षाच्या संघात समावेश केला नाही. कसोटीतील गचाळ कामगिरी भारतीय खेळाडूंना चांगलीच भोवली.
आयसीसी वनडे संघ
मो. हाफिज, क्विंटन डी कॉक, विराट कोहली, जॉर्ज बेली, एल्बी डिव्हिलर्स, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक, कर्णधार), डेवेन ब्राव्हो, जेम्स फ्युकनर, डेल स्टेन, मो. शमी, अजंता मेंडिस, रोहित शर्मा.
आयसीसी कसोटी संघ
डेव्हिड वॉर्नर, केन विल्यम्सन, कुमार संगकारा, एल्बी डिव्हिलर्स, जो. रुट, अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), मिशेल जॉन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, डेल स्टेन, रंगना हेराथ, टीम साऊथी, रॉस टेलर. संघात एकही भारतीय खेळाडू नाही.