आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni Buy Chennai Team For Indian Super League Football

इंडियन सुपर लीग: फुटबॉल लीगमध्ये धोनी चेन्नई संघाचा सहमालक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा संघ आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत किक मारताना दिसेल. त्याने सहभागीदारीतून आयएसएलसाठी नुकताच ‘चेन्नईयन एफसी’ संघ खरेदी केला आहे. यासह धोनी आता क्रिकेट आणि फुटबॉलच्या लीगमध्ये सहभागी झालेल्या चेन्नईच्या दोन फ्रँचायझीसोबत काम करणार आहे. आयपीएलच्या टी-२० लीगमध्ये धोनी हा चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे नेतृत्व करतो.

येत्या १२ ऑक्टोबरपासून सुरू होणा-या आयएसएलमध्ये आठ संघ सहभागी झाले आहेत. आयपीएलच्या धर्तीवर ही फुटबॉल लीग होणार आहे. या लीगमध्ये ऐनवेळी चेन्नईच्या फ्रँचायझीने सहभाग घेतला. मात्र, या वेळी बंगळुरूच्या फ्रँचायझीने या लीगमधून माघार घेतली. त्यामुळे चेन्नईला संधी देण्यात आली. चेन्नईयन एफसीचा लीगमधील पहिला सामना १५ ऑक्टोबरला गोवा संघाशी होईल.

मार्को, मेंडोजा चेन्नई संघात
इटलीचा माजी वर्ल्ड चॅम्पियन मार्को मतेराजी, कोलंबियाचा स्टार मेंडोजा आणि फ्रान्सचा माजी डिफेंडर स्लीवेस्ट्रो आता लीगमध्ये सहभागी झालेल्या चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. मतेराजी हा प्रशिक्षक आणि खेळाडूच्या भूमिकेत संघात सहभागी झाला आहे.

सचिनपाठोपाठ चार क्रिकेटपटूंचा पुढाकार
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपाठोपाठ चार क्रिकेटपटूंनी लीगमधील संघ खरेदीसाठी पुढाकार घेतला. सचिनचा केरळा ब्लास्टर्स संघ लीगमध्ये खेळणार आहे. तो या संघाचा सहमालक आहे. याशिवाय गांगुलीचा कोलकाता आणि विराट कोहलीचा गोवा संघदेखील लीगमध्ये नशीब आजमावणार आहेत. त्यापाठोपाठ आता धाेनीचा चेन्नईयन एफसी संघ सहभागी झाला.

आयएसएल ट्रॉफीचे अनावरण
मुंबई | आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीचे रविवारी मोठ्या उत्साहात अनावरण झाले. आयपीएलच्या धर्तीवर फुटबॉलची ही स्पर्धा रंगणार आहे. येत्या १२ ऑक्टोबरपासून पहिल्या सत्रातील या लीगला सुरुवात होईल. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेदरम्यान चाहत्यांचे जबरदस्त मनोरंजन होईल, अशी आशा उपस्थितांनी व्यक्त केली. फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंटच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण झाले. ही ट्रॉफी २६ इंच लांब आणि २४ कॅरेटच्या सोन्याने मढवलेली आहे, अशी माहिती आयएसएलच्या आयोजकांनी दिली.