आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni Fit For World Cup, Former Captain Bishansingh Bedi

वर्ल्डकपसाठी धोनी योग्य, माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आगामी २०१५ विश्वचषक स्पर्धेसाठी महेंद्रसिंग धोनी हाच योग्य कर्णधार आहे. त्याच्यानंतर संघात दुसरा कोणीही दावेदार नाही, असा दावा भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी केला. मात्र आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणा-या बेदींनी धोनी कसोटी क्रिकेटसाठी योग्य कर्णधार नसल्याचीही टीका केली. व्हेरॉकच्या वतीने आयोजित शालेय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी बिशनसिंग बेदी हे शहरात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भारतीय संघ परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये खूप मागे आहे. भारतीय खेळाडू आता आयपीएल, टी-२० सारख्या क्रिकेटच्या मागे लागल्याने आपण कसोटीत कधीच पुढे जाऊ शकत नाही. वेस्ट इंडीजच्या माघारीनंतर बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्ध ५ एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन केले. आगामी ऑस्ट्रेलिया दौरा पाहता हा चुकीचा निर्णय आहे. त्यामुळेच आपल्या क्रिकेटचे नुकसान होत आहे. आयसीसीने डे-नाइट कसोटी सुरू करण्याचा घेतलेला निर्णयही अयोग्य आहे. आजदेखील कसोटीला चांगला प्रेक्षकवर्ग आहे. याच क्रिकेटमध्ये खेळाडूंची प्रगल्भता दिसून येते, असे बेदी म्हणाले.

देशी प्रशिक्षक का नको?
देशात चांगले प्रशिक्षक आहेत. अनुभवी व माजी खेळाडूदेखील अनेक आहेत, त्यांना संधी का दिली जात नाही? देशातील प्रशिक्षकांवर माध्यमांनी प्रकाश टाकला पाहिजे. त्यांना दूर ठेवून चालणार नाही. संघटनेत जसा विदेशी माणूस घेतला जात नाही, तसा प्रशिक्षकही देशी असायला काय हरकत आहे, असे ते म्हणाले

सचिनच्या पुस्तकावर टोला
नुकतेच सचिन तेंडुलकरने लिहिलेल्या पुस्तकावरून पुन्हा एकदा चॅपेल वाद सुरू झाला आहे. अनेकांनी चॅपेल यांच्यावर टीका केली. बेदी यांनी आपण पुस्तक वाचले नाही, त्यामुळे त्यावर बोलणार नसल्याचे म्हटले. त्याचबरोबर सचिनला पुस्तक विकायचे आहे, असा टोलाही मारला.

श्रीनिवासन यांचा अट्टहास का ?
श्रीनिवासन यांनी बीसीसीआयसह आयसीसीचेही अध्यक्षपद भूषवले आहे. आता पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी ते एवढा अट्टहास का करत आहेत, हेच मला कळत नाही. राजकारण्यांमुळे संघटनांमध्ये खेळाडूंना बाहेर बसावे लागत आहे. क्रिकेट मंडळ खेळाडूंना कधीही पुढे येऊ देणार नसल्याचे ते म्हणाले.

लीग स्पर्धा म्हणजे व्यवसाय
सध्या आयपीएलमुळे देशात सर्वच खेळांच्या लीग स्पर्धा होत आहेत. या स्पर्धा खेळाडूंच्या हिताच्या नसून केवळ पैसा कमवण्याचा व्यवसाय झाला आहे. राजकारणी आणि बेटिंग करणा-यांशी लीगचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे आयपीएलसह अनेक लीग स्पर्धेत सामने फिक्स करून बेटिंग केले जात असल्याचा आरोप बेदींनी केला.