आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीकडेच भारताच्या यशाची किल्ली, माजी कर्णधार चंदू बोर्डे यांचे स्पष्ट मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विश्वविजेत्या भारतीय संघातील २०११ चे प्रमुख क्रिकेटपटू संघात नसताना कप्तान महेंद्रसिंह धोनी याच्या हातातच विश्वचषकातील भारताच्या कामगिरीची किल्ली असल्याचे भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे यांनी म्हटले आहे.

भारतीय संघ युवराजसिंग, वीरेंद्र सेहवाग, जहीर खान, हरभजनसिंग आणि गौतम गंभीर तसेच सगळ्यात मुख्य म्हणजे सचिन तेंडुलकरविना यंदाच्या विश्वचषकाला सामाेरा जात आहे. त्यामुळे भारतीय संघात अनुभवाची उणीव आहे, असे मी म्हणणार नाही. या संघात गत विश्वचषक खेळलेले ४ खेळाडू असून नव्या-जुन्या खेळाडूंचे मिश्रण त्यात करण्यात आले आहे. मात्र, हे काहीही असले तरी आपला कप्तान खूप अनुभवी असून अत्यंत शांतचित्ताने सारे निर्णय घेऊ शकतो. संघातील खेळाडूंना कसे प्रोत्साहित करायचे, ते त्याला चांगलेच ज्ञात असल्याचेही बोर्डे यांनी म्हटले.

एकजुटीने खेळले तरच...
संघाला फलंदाजीत फार समस्या येणार नाही, असे वाटते. मात्र, गोलंदाज पूर्ण फिट नसल्यास समस्या निर्माण होऊ शकते. अर्थात, काहीही झाले तरी संघाला एकजुटीने विजयासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. संपूर्ण संघाने गेमप्लानप्रमाणे खेळ केला, तरच विजय शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

भारतीय संघ याेग्य वेळी लय पकडेल
एकदिवसीय क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेले आहे. त्यामुळे भारतीय संघ मागील मालिकेतून वाईटरीत्या पराभूत झाला असला तरी ऐन विश्वचषकात भारतीय संघाला योग्य लय सापडू शकते. तसे झाल्यास भारतीय संघ पुन्हा चांगली कामगिरी बजावू शकतो, असे भारतीय महिला संघाची माजी कप्तान अंजुम चोप्रा यांनी म्हटले आहे.

विराटने अधिकाधिक खेळावे
विराट हा भारताचा महत्त्वाचा फलंदाज असल्याने त्याने अधिकाधिक षटके खेळणे आवश्यक असल्याने तिस-या क्रमांकावर फलंदाजीस यावे, असे मला वाटते. अर्थात रहाणेदेखील चांगला पर्याय आहे, पण विराटला अधिकाधिक षटके खेळायला मिळाल्यास भारताला चांगली धावसंख्या उभारणे शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.