चेन्नई - आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू असलेल्या माइक हसीने धोनीला धैर्यवान कप्तान म्हटले आहे, तर दुसरीकडे युवराजचे वडील योगराजसिंग यांनी धोनी हा रावणासारखा अहंकारी असल्याचे म्हटले.
योगराजची पुन्हा टीका
युवराजसिंगला वर्ल्डकप संघात घेतले गेले नसल्याबाबतचा वाद थांबण्याचे अद्यापही लक्षण दिसत नाही. युवराजचे वडील योगराजसिंग यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धोनीला रावणाची उपमा दिली. अहंकारी रावणाच्या दुराभिमानाचा ज्याप्रमाणे चक्काचूर झाला, त्याप्रमाणेच धोनीचेही एक दिवस होईल, असेही योगराजने नमूद केले.
२०११ च्या विश्वचषकातील फायनलमध्ये युवराजऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरून धोनीने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हीरो बनण्याचे श्रेय घेतले. जर धोनी स्वत:ला इतका महान समजत होता, तर नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात चौथ्या क्रमांकावर का उतरला नाही? त्या वेळी धोनीच्या खेळीची संघाला गरज होती, असेही योगराज म्हणाले.
धोनी अफलातून - हसी
धोनी कोणत्याही परिस्थितीत अत्यंत शांत राहू शकतो. त्याच्या या अफलातून धैर्याने मी नेहमीच प्रभावित झालो आहे. त्याच्याबरोबर अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यास ती एक वेगळीच मजा असते. धोनी आत्मविश्वासाने ओथंबलेला असतो. धोनी शांत राहून अडचणीत मार्ग काढतो, असे हसी म्हणाला.