आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी विश्वचषक स्पर्धेत स्वतःचा सहभाग अनिश्चित असल्याचे सांगणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता चक्क या स्पर्धेसाठी तयारी करु लागला आहे. कर्णधारपदावरुन हटविण्याची एकीकडे जोरदार मागणी होत असताना धोनी 2015च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याच्या तयारीत आहे. धर्मशाळा येथील वन डे सामना गमाविल्यानंतर धोनीने सांगितले की, 2015 मध्ये होण-या विश्वचषक स्पर्धेसाठी सर्वोत्तम खेळाडुंचा एक पूल बनविण्याबाबत विचार करीत असून हेच पुढील लक्ष्य आहे.
या वक्तव्यावरुन स्पष्ट होते की धोनीचा पुढील विश्वचषक स्पर्धेत कर्णधारपद कायम राखण्याचा इरादा आहे. काही खेळाडुंची नावे विचारल्यानंतर तो म्हणाला, वन डेमध्ये सध्या खेळत असलेल्या खेळाडुंचा एक पूल आहे. हा पूल आणखी मोठा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जेवढे जास्त पर्याय उपलब्ध होतील, तेवढे चांगले, असे धोनी म्हणाला.
धोनीने मोहाली वन डेमध्ये रोहित शर्माला सलामीला खेळविले. तर सुरेश रैनाकडून तो जास्त जबाबदारीपूर्वक खेळाची अपेक्षा करीत आहे. रैनाला धोनी वरच्या क्रमांकावरही फलंदाजीस उतरवू शकतो. इग्लंडविरुद्ध धोनीने काही प्रयोग केले. त्यासंदर्भात विचारले असता धोनी म्हणाला, कर्णधार म्हणून मला काही प्रयोग करणे आवश्यक आहे. दिर्घकाळ खेळण्याची क्षमता असलेल्यांना जास्तीत जास्त संधी देणे माझी जबाबदारी आहे. प्रयोग अपयशी ठरल्यावर प्रत्येकजण माझ्यावरच टीका करतो. धोनीने जडेजाचे गोडवे गायले. तसेच इरफान पठाणही त्याच्या यादीत आहे.
महेंद्रसिंग धोनीने 2011 मध्ये भारतात झालेली विश्वचषक स्पर्धा जिंकवून दिली. परंतु, त्यानंतर तो सपशेल पराभूत झाला आहे. त्याला लाजिरवाणे कसोटी मालिका पराभव स्विकारावे लागले आहे. याच धोनीने सुमारे वर्षभरापूर्वी सांगितले होते की, पुढील विश्वचषक स्पर्धा खेळणार की नाही, हे सांगू शकत नाही. तसेच स्वतःला त्या स्पर्धेत कर्णधार म्हणून पाहत नाही, असेही तो म्हणाला होता. परंतु, इंग्लंडविरुद्ध मायदेशात वन डे मालिका विजय मिळाल्यानंतर तो 2015 मध्येही कर्णधारपद भूषविण्याचे स्वप्न पाहू लागला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.