लुसाने - अमेरिकेचा स्टार जस्टिन गॅटलीन आयएएएफ डायमंड लीग अँथलेटिक मीटमध्ये सर्वात वेगवान धावपटू ठरला. त्याने पुरुषांच्या गटात 100 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. अमेरिकेच्या या धावपटूने 9.80 सेकंदात निश्चित अंतर पूर्ण केले.
याशिवाय अमेरिकेच्या टायसन गेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने 9.93 सेकंदासह दुसर्या स्थानी धडक मारली. तसेच अमेरिकेच्याच मिचेल रोडग्रेसने कांस्यपदक पटकावले. त्याने 9.98 सेकंदासह 100 मीटरची रेस पूर्ण करून तिसरे स्थान गाठले. पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीमधील तिन्ही पदकांवर अमेरिकेच्या धावपटूंनी नाव कोरले. याच गटात जमैकाचा केमार कोले हा 10.14 सेकंदासह पाचव्या स्थानावर राहिला.
मेर्सी चेरोंड अव्वलस्थानी
केनियाच्या मेर्सी चेरोंडने महिलांच्या 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत अव्वल स्थान गाठले. तिने 8:50.24 सेकंदात अंतर पूर्ण करून सुवर्णपदक नावे केले. तसेच इथोपियाच्या गेंझेबे डिबाबाने रौप्यपदकाची कमाई केली. तिने 8:50.81 सेकंदात अंतर पूर्ण केले. जेलागटला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
बोगडान चॅम्पियन
पुरुष गटाच्या उंच उडी प्रकारात युक्रेनचा बोगडान बोडारेन्को चॅम्पियन ठरला. त्याने 2.40 मी. उडी घेऊन सुवर्णपदक जिंकले. आद्रिया प्रोस्टेन्कोने दुसर्या स्थानी धडक मारली. रशियाचा इव्हान उखोव (2.38) कांस्यचा मानकरी ठरला.
(फोटो - अमेरिकेचा जस्टीन गॅटलीन)