आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया ओपन स्क्वॅश : दीपिका सेमीफायनलमध्ये; अमेरिकेची शोबी पराभूत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनबेरा- भारताची स्टार खेळाडू दीपिका पल्लीकलने शुक्रवारी ऐतिहासिक विजयाची नोंद करत ऑस्ट्रेलिया ओपन स्क्वॅश स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत प्रवेश करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तिने अमेरिकेच्या अमांडा शोबीला 11-5, 11-7, 12-10 ने पराभूत केले.
उपांत्यपूर्व सामन्यात अकरावी मानांकित दीपिकाची निराशाजनक सुरुवात झाली. मात्र, तरीही सुरेख व चपळ खेळीचे प्रदर्शन करत पहिल्या गेममध्ये 11-5 ने बाजी मारून आघाडी मिळवली. या आव्हानाला राखून ठेवत तिने कोर्टवर आपला दबदबा निर्माण केला. दरम्यान, दुसर्‍या सेटमध्ये अमेरिकेच्या शोबीने पुनरागमननाचा प्रयत्न करत बरोबरी साधण्यासाठी धडपड सुरू केली.या वेळी दुसर्‍या सेटमध्ये तिने बरोबरीची खेळी करत विजयाचे संकेत दिले होते.मात्र, दीपिकाने वेळीच कलाटणी देऊन दुसरा सेट 11-7 अशा फरकाने आपल्या नावे केला. त्यानंतर झालेल्या तिसर्‍या गेममध्ये शोबीने भारताच्या खेळाडूला जेरीस आणले होते. प्रत्युत्तराची सुरेख खेळी करत तिने दीपिकाला चांगलेस झुंजवले.मात्र, सरस कामगिरी करत तिने तिसरा सेटही आपल्या नावे केला. 12-10 ने तिसरा सेट जिंकून दीपिकाने उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित केला.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दबदबा- दीपिकाने आपल्या चमकदार खेळीच्या बळावर आतापर्यंत पाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांत आपला दबदबा निर्माण केला आहे. र्जमन ओपन, डच, फ्रेंच, स्कॉटिश ओपन व युरोपियन ओपनचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. लंडन येथे तिने पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली होती. नोव्हेंबर 2011 मध्ये वर्ल्ड ओपनच्या अंतिम आठमध्ये धडक मारणारी ती पहिली भारतीय खेळाडू होती.
आता लॉउरा मासारोचे तगडे आव्हान- उपांत्य फेरीपर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठणार्‍या दीपिकाला आता इंग्लंडच्या अव्वल मानांकित खेळाडूंच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. दीपिकाची गाठ आता चौथ्या मानांकित लॉउरा मासारोशी पडणार आहे. भारताच्या स्टार खेळाडूने धक्कादायक निकालाची नोंद करून पदकाचा प्रबळ दावा निर्माण केला आहे. त्यामुळे या सामन्याविषयी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता लागली आहे.
तीन वर्षांपूर्वी ठरली होती अपयशी- दीपिकाने तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया ओपन स्क्वॅशच्या पहिल्याच फेरीत गारद झाली होती. दरम्यान, तिला पाचव्या मानांकित खेळाडूने धूळ चारली होती. त्यानंतर तब्बल तीन वर्षांच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर तिने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा प्रवास यशस्वीपणे गाठून इतिहास रचला.
- व्यूहरचना यशस्वी ठरली- शोबीविरुद्ध सामन्यात सुरुवात निराशाजनक झाल्याने प्रचंड दडपण आले होते. मात्र, मनावर ताबा ठेवून सारा ताण दूर करता आला. या वेळी जिंकण्यासाठी रचलेली व्यूहरचना पूर्णपणे यशस्वी झाली. यातून माझा आत्मविश्वास वाढत गेला. - दीपिका पल्लीकल