आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipika Pallikal News In Marathi, Divya Marathi, Commonwealth Games

दीपिकाकडून दमदार कामगिरीची आशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येत्या 23 जुलैपासून सुरू होणा-या 20 व्या राष्‍ट्रकुल स्पर्धेत दमदार पदार्पण करण्यासाठी भारताची अव्वल स्क्वॅशपटू दीपिका पल्लिकल सज्ज झाली आहे. आजारपणामुळे तिला दिल्लीत 2010 मध्ये झालेल्या राष्‍ट्रकुल स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. मात्र, यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्याच्या मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे तिने स्पष्ट केले.

नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत भारताच्या दीपिकाने टॉप-10 मध्ये धडक मारली आहे. क्रमवारीत टॉप-10 मध्ये पोहोचणारी ती पहिली भारतीय स्क्वॅशपटू ठरली. या कामगिरीच्या बळावर तिने स्कॉटलंड येथील राष्‍ट्रकुल स्पर्धेतील आपल्या पदकाचा दावाही मजबूत केला आहे. राष्ट्रकुलमध्ये स्क्वॅश या खेळ प्रकारात भारताला अद्याप समाधानकारक कामगिरी करता आली नाही. मात्र, यंदाच्या स्पर्धेत दीपिकाच्या रूपात भारताकडे मजबूत खेळाडू उपलब्ध आहे.
तिहेरी पदकाची संधी : दीपिका पल्लिकलला या स्पर्धेत तिहेरी पदकाची संधी आहे. ती या स्पर्धेत एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दीपिका महिला दुहेरीत युवा खेळाडू जोश्ना चिनप्पासोबत नशीब आजमावेल. तसेच मिश्र दुहेरीत दीपिका आणि सौरवसोबत खेळण्याची संधी आहे.

चार वर्षांनंतर स्वप्नपूर्ती
दीपिका पल्लिकलला 2010 मध्ये गंभीर आजारपणामुळेच दिल्ली येथील राष्‍ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागले होते. करिअरमधील मोठी संधी तिला गमवावी लागली होती. मात्र, त्यानंतर तिने तब्बल चार वर्षांच्या दीर्घ मेहनतीच्या बळावर राष्‍ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची स्वप्नपूर्ती केली आहे.