आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipika Pallikal Powers Into Texas Open Quarterfinals News In Divya Marathi

टेक्सास ओपन स्क्वॅश चॅम्पियनशिप : दीपिका पल्लिकल उपांत्यपूर्व फेरीत दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्युस्टन - भारताची स्टार खेळाडू दीपिका पल्लिकलने शुक्रवारी टेक्सास ओपन स्क्वॅश चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिने सलामी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पात्रता धारक डोना उरकुहार्टला पराभूत केले. तिने 12-10, 11-8, 11-5 अशा फरकाने विजयी सलामी दिली. यासह भारताच्या खेळाडूने अवघ्या 36 मिनिटांत 50,000 डॉलरचे बक्षीस असलेल्या स्पर्धेच्या अंतिम आठमधील प्रवेश निश्चित केला.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने पहिल्या गेममध्ये दीपिकाला चांगलेच झुंजवले. मात्र, चोख प्रत्युत्तर देत भारताच्या महिला खेळाडूने पहिल्या गेममध्ये बाजी मारून दमदार सुरुवात केली. त्यापाठोपाठ तिने दुसर्‍या गेममध्येही यश संपादन केले. यासह तिने तिसर्‍या गेममध्येही डोनाला पराभूत केले आणि अंतिम आठमध्ये धडक मारली.

‘स्पर्धेच्या आगामी अंतिम फेरीपर्यंत विजयाचा हा उत्साह कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. या स्पर्धेत माझी दमदार विजयाने चांगली सुरुवात झाली. यासाठी केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले. विजेतेपदाचा बहुमान पटकावण्यासाठी मेहनत करणार आहे, अशी प्रतिक्रिया दीपिकाने विजयानंतर दिली.

जोश्ना चिनप्पाचा पराभव
दुसरीकडे भारताची युवा खेळाडू जोश्ना चिनप्पाला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत 21 व्या स्थानी असलेल्या जोश्नाला सलामी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या रशेल ग्रिनहॅमने 11-7, 11-5, 11-5 अशा फरकाने पराभूत केले. या पराभवासह जोश्नाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

दीपिका-निकोलट उपांत्यपूर्व सामना
आता दीपिकाचा उपांत्यपूर्व सामना जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानी असलेल्या निकोलट फर्नांडिसशी होईल. निकोलटने सलामी सामन्यात हाँगकाँगच्या एनी यूचा पराभव केला. तिने 12-10, 10-12, 11-5, 8-11, 11-8 अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी तिला पाचव्या मानांकित एनीने चांगलेच झुंजवले.