मेलबर्न - जगातील नंबर वन नोवाक योकोविक, गत चॅम्पियन स्टॅन वावरिंकाने किताबाच्या
आपल्या मोहिमेला मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत दमदार सुरुवात केली. या दोघांनी आपापल्या गटातील एकेरीचे सामने जिंकून स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. बिगरमानांकित अझारेंकानेही विजयी सलामी दिली.
जपानच्या पाचव्या मानांकित केई निशिकोरी आणि महिला गटातील चौथी मानांकित पेत्रा क्वितोवा, १८ वेळची ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सनेही स्पर्धेत विजयाचे खाते उघडले.
सर्बियाच्या नोवाक योकोविकने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात स्लाेव्हेनियाच्या अलाझ बेडेनेचा पराभव केला. त्याने ६-३, ६-२, ६-४ अशा फरकाने विजय मिळवला. यासह त्याने दुसरी फेरी गाठली. अव्वल मानांकित योकोविकने एक तास ४९ मिनिटांत सामना जिंकून पुढच्या फेरीतील प्रवेश निश्चित केला.
विल्यम्स भगिनींची आगेकूच : जागतिक क्रमवारीतील नंबर वन सेरेना आणि माजी नंबर वन व्हिनस या अमेरिकेच्या विल्यम्स भगिनींनी महिला एकेरीत आगेकूच केली. १८ व्या मानांकित व्हिनसने सलामीला स्पेनच्या एम. टोरो-फ्लोरवर ६-२, ६-२ अशा फरकाने मात केली. तसेच अव्वल मानांकित सेरेनाने बेल्जियमच्या ए. वान उयात्वासेकचा ६-०, ६-४ ने पराभव केला.
अझारेंकाचा एकतर्फी विजय
दोन वेळच्या चॅम्पियन व्हिक्टोरिया अझारेंकाने अमेरिकेच्या स्लाेआने स्टिफेन्सविरुद्ध ६-३, ६-२ असा विजय मिळवला. आता तिचा सामना आठव्या मानांकित कॅरोलिना वोज्नियाकीशी होईल. वोज्नियाकीने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या टेलर टाऊसेंडवर ७-६, ६-२ ने मात केली.
वावरिंका ८९ मिनिटांत विजयी
गतविजेत्या वावरिंकाला विजयी सलामी देण्यासाठी तब्बल एक तास २९ मिनिटे झुंज द्यावी लागली. मात्र, त्याने सरस खेळी करताना शानदार विजय साकारला. चौथ्या मानांकित वावरिंकाने पहिल्या फेरीत तुर्कीच्या मार्सेल इलहानचा पराभव केला. त्याने ६-१, ६-४, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला.