आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळात करिअर करा: सुशील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी भारतभर विविध कुस्ती स्पर्धांच्या निमित्ताने खूप फिरलो आहे. आपल्या देशात खेळाला पोषक अशी प्रचंड गुणवत्ता असल्याचे माझे ठाम मत आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत ही गुणवत्ता विखुरली आहे. विविध खेळांतील गुणवंत ओळखून त्यांना योग्य ती संधी देणे आणि त्यांना आकार देणे गरजेचे आहे. शासनाकडून विविध योजनांद्वारे तसे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही अनेक गुणवंतांना आपण शोधून पुढे आणू शकतो, असे मला वाटते. ग्रामीण भागात अपु-या सोयी, सुविधेअभावी अनेक खेळाडूंची कारकीर्दीच्या सुरुवातीलाच अखेर होऊन जाते. हरियाणा आणि मध्य प्रदेशात परिस्थिती भिन्न आहे. या दोन्ही राज्यांत खेळाच्या अनेक सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या आहेत. हरियाणाचा मी स्वत: साक्षीदार आहे. मात्र, इतर राज्यांतही अशा थेट प्रयत्नांची गरज असल्याचे मला वाटते. लहान मुला-मुलींच्या करिअरचे बहुतेक निर्णय पालक घेताना आढळतात. मात्र, त्यांच्या आवडी-निवडी तपासून त्यांना करिअरची संधी दिली पाहिजे. आज खेळातही मोठे करिअर आहे. सायना नेहवालकडे बघा. तिच्या जन्मापासून ते आतापर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा असाच आहे. सायनाशिवाय, पी. व्ही. सिंधू, तिरंदाज दीपिकाकुमार, टेनिसपटू सानिया मिर्झा अशा किती तरी महिला खेळाडूसुद्धा जग गाजवत आहेत. कुस्तीच्या रिंगणातही महिला खेळाडूंचे प्रमाण कमी नाही. या खेळाडूंच्या पालकांनी मुला-मुलींत भेद केला नाही. मुलींनाही पूर्ण संधी दिल्याने या खेळाडू आज ‘स्टार’ झाल्या.


गगन नारंग, राज्यवर्धन राठोड, अभिनव बिंद्रा, माझा मित्र योगेश्वर दत्त, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, धोनी अशी अनेकांची नावे घेता येतील. या सर्वांनी अथक परिश्रमाने नाव कमवले. या सर्वांनी खेळात करिअर केले आहे. खेळात आज पैसा, प्रसिद्धी, नोकरी, नाव, सन्मान, पुरस्कार आदी सर्व आहेत. चांगली कामगिरी करणा-या खेळाडूंना रेल्वेत, पोलिस खाते, शासकीय तसेच विविध कंपन्यांत नोकरीची संधी मिळत आहे. मग खेळाकडे करिअर म्हणून पाहण्यास संकोच बाळगण्याची गरज नाही. मनातील भीती दूर करा आणि खेळालाही करिअर म्हणून निवडा. खेळामुळे व्यक्ती अधिक प्रगल्भ होते. त्याचा आत्मविश्वास वाढतो. देशासाठी खेळण्याचा आनंद आणि अभिमान...त्यातून मिळणा-या समाधानाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.


‘भारतरत्न’साठी ध्यानचंद, सचिन योग्यच
भारतरत्न पुरस्कारासाठी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा पहिला हक्क आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर व्हायला हवा. आपल्या देशात खेळाची पाळेमुळे ख-या अर्थाने त्यांनीच रुजवली. अटकेपार खेळाच्या मैदानात भारताला पहिल्यांदा त्यांनीच ओळख दिली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकांनी खेळाच्या मैदानावर पाय ठेवले. त्यांना हा पुरस्कार देणे योग्य निर्णय ठरेल. इतकेच नव्हे, तर क्रिकेटस्टार सचिन तेंडुलकरही या पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती आहे. सचिनलाही हा पुरस्कार मिळायला हवा, असे माझे स्पष्ट मत आहे.

शब्दांकन: राजेश शर्मा