आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनाच्या व्यथांना त्यांनी एकांकिकेतून फोडली वाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थळ - एका फ्लॅटमधील खोली.

प्रेक्षक - ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर आणि मंडळी.

सादरकर्ते - शेवगावचे हौशी रंगकर्मी.

जागतिक रंगभूमी दिन असा अभिनव पद्धतीने नगरमध्ये साजरा झाला. एकांकिकेचे नाव होते ‘आकडा’. ग्रामीण भागात सुरू असलेल्या विजेच्या भारनियमनाच्या विरोधात राजकीय पक्ष, तसेच विविध संघटनांच्या वतीने मोर्चे काढण्यात येतात, महावितरणच्या अधिकार्‍यांना मेणबत्ती देऊन ‘गांधीगिरी’ केली जाते, पण एकांकिकेच्या माध्यमातून या समस्येवर अधिक प्रभावीपणे भाष्य करता येते, हे शेवगाव येथील उपक्रमशील शिक्षक उमेश घेवरीकर यांनी मंगळवारी दाखवून दिले.

‘शिवाजी महाराज अंडरग्राउंड’ या नाटकामुळे सध्या चर्चेत असलेल्या राजकुमार तांगडे यांनी दहा वर्षांपूर्वी लिहिलेली ‘आकडा’ ही एकांकिका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेतर्फे खास अमरापूरकर यांच्यासाठी मंगळवारी सादर करण्यात आली. बालिकार्शम रस्त्यावरील धर्माधिकारी मळ्यातील अमरापूरकर राहत असलेल्या इमारतीमधील एका रिकाम्या फ्लॅटमध्ये हा प्रयोग रंगला. दिग्दर्शक उमेश घेवरीकर यांच्यासह मफिज इनामदार, फिरोज काझी, दादा नवघरे, जकीर काझी यांनी त्यात भूमिका केल्या.

भारनियमनामुळे ग्रामीण भागात शेतकर्‍यांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होत आहे, हे दाखवताना महावितरण आणि शासनाच्या धोरणातील अनेक विसंगतींवर या एकांकिकेत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. बीड येथे झालेल्या नाट्य परिषदेच्या स्पर्धेत ही एकांकिका सादर झाली होती. आता या एकांकिकेचे शेवगाव तालुक्यातील निवडक खेड्यांमध्ये प्रयोग करण्यात येणार आहेत.

या एकांकिकेचे अमरापूरकर यांनी कौतुक केले. सामाजिक आशयाचे कसदार सादरीकरण, तेही नैसर्गिक अभिनयात केल्याबद्दल त्यांनी कलावंतांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांची पत्नी सुनंदा अमरापूरकर, आकाशवाणीच्या नगर केंद्राचे कार्यक्रम प्रमुख प्रदीप हलसगीकर, स्नेहालयचे दीपक रामदिन आदी उपस्थित होते.