Home »Sports »Expert Comment» Expert Comment On India Vs Australia Test Cricket

हरभजनला अमरनाथकडून बोध घेण्याची गरज..!

अयाज मेमन | Feb 24, 2013, 07:45 AM IST

  • हरभजनला अमरनाथकडून बोध घेण्याची गरज..!

हरभजनसिंग 100 कसोटी खेळणारा दहावा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. यावर त्याचा निश्चितपणे हक्क आहे. मात्र, हेसुद्धा निश्चित आहे की, चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो दमदार कामगिरी करू शकला नाही तर त्याला अधिक संधी मिळवण्याची शक्यता कमीच आहे. तसेसुद्धा चेन्नई कसोटीचे अद्याप फक्त दोनच दिवस झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही शिल्लक आहे. अर्थात हरभजनकडे चेन्नईत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी असेल. मात्र, दमदार कामगिरीसाठी त्याला तोच आत्मविश्वास, योग्यता आणि विकेट मिळवण्याची भूक दाखवावी लागेल, जी त्याने 408 विकेट घेण्यासाठी दाखवली होती.

चेन्नईच्या खेळपट्टीवर पहिल्या तासापासून टर्न आणि चेंडूला उसळी होती. यावर हरभजनकडून मोठी अपेक्षा होती. ‘टर्बनेटर’ या फ्लॅट विकेटवर दोन दिवस पूर्णपणे प्रभावहीन दिसला. त्याला संघात सामील केल्याबद्दलही प्रश्न निर्माण झालेत. मात्र, त्याचा विशाल अनुभव आणि ऑस्ट्रेलियविरुद्धचा शानदार रेकॉर्ड पाहता त्याच्या संघातील निवडीला सहमती न देणे कठीण आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेषत: वयाची तिशी ओलांडलेल्या खेळाडूंसाठी अत्यंत कठीण असते. तोपर्यंत विरोधी खेळाडूंना आपली पूर्ण ओळख झालेली असते. अशा वेळी फक्त फिट राहून जमत नाही तर आपल्या खेळात नावीन्यसुद्धा आणावे लागते. मन्सूर अली खान पतौडी यांनी मला एकवेळ सांगितले होते की, त्यांनी पुनरागमनाचा घेतलेला निर्णय हे त्यांच्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान होते. हे आव्हान फिटनेस नव्हे, तर मोटिव्हेशन होते. पतौडी यांच्या शब्दात, ‘मी पूर्वी जशी कामगिरी केली होती तसेच प्रदर्शन पुन्हा करू शकेल काय, अशी शंका त्या वेळी खेळाडू स्वत:च घेऊ लागतो.’ पतौडी यांनी 1972 मध्ये वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली पुनरागमन केले होते. यानंतर नेतृत्वसुद्धा केले आणि आता आपल्यासाठी खेळणे कठीण झाल्याचे सांगत निवृत्तीसुद्धा घेतली. अतिशय चिवट खेळाडू असलेल्या पतौडी यांनी कार अपघातात एक डोळा गमावला. यानंतरही त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली एक उंची निर्माण केली होती. मात्र, पुनरागमन त्यांच्यासाठीसुद्धा कठीणच होते. इतक्यात युवराजसिंगने कॅन्सरला पराभूत केले. टीम इंडियात पुनरागमन करताना युवीने कसोटी सामनाही खेळला. मात्र, कसोटी संघात तो आपले स्थान कायम ठेवू शकला नाही. पुनरागमनाबाबत बोलायचे तर मोहिंदर अमरनाथ यांचे नाव सर्वांच्या तोंडी येते. त्यांनी 1969 मध्ये मध्यमगती गोलंदाज म्हणून सुरुवात केली होती. पुढचे 10-12 वर्ष ते बर्‍याच वेळा संघातून आत बाहेर झाले. यानंतर 1982-83 मध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करून संघातील आपले स्थान निश्चित केले. ‘जिमी’ची मजबूत इच्छा शक्ती हे त्याच्या यशस्वी पुनरागमनाचे मोठे कारण होते. आपल्या टीकाकारांना त्याला उत्तर द्यायचे होते. यामुळे तासनतास नेटवर सरावात घालायचा, आपल्या उणिवा दूर करायचा. आज त्याच्या टीकाकारांपासून ते सर्व सहकारीसुद्धा त्याची वारंवार स्तुती करतात. हरभजनने पुनरागमनासाठी अमरनाथकडून बोध घेतला पाहिजे. भज्जी जुन्या रेकॉर्डच्या आधारावर टीममध्ये कायम राहू शकत नाही. रक्षात्मक खेळाद्वारेसुद्धा असे शक्य नाही. तो आता 32 वर्षांचा आहे. चार ते पाच वर्षे अजून खेळू शकतो. मात्र, हेसुद्धा खरे आहे की, वेळ त्याच्या हातून निसटतोय.आणि निवड समितीचा संयम आणि विश्वासही कमी होत आहे.

Next Article

Recommended