आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्रात होणार एफ-1 रेसिंग ट्रॅक?,सिंधुदुर्गमधील चौकूळ येथील जागेची पाहणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतातील नोएडा येथील फॉर्म्युला वन या मोटर रेस ट्रॅकप्रमाणे दुसरा रेसिंग ट्रॅक महाराष्‍ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकूळ येथे होण्याची शक्यता आहे. चौकूळ येथे शासनाच्या मालकीची 5 ते 6 हजार एकर एवढी जागा उपलब्ध आहे. तेथे फॉर्म्युला वन ट्रॅक करता येईल का, असे नियोजन करण्याच्या सूचना उद्योगमंत्री नारायण राणे यांनी खात्याला केल्याचे कळते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्पांबाबत आज 3 फेब्रुवारी रोजी बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिका-यांसमवेत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री नारायण राणे यांनी आढावा घेतला. त्या वेळी राणे यांनी ट्रॅकसाठीच्या नियोजनाची कल्पना मांडली.
या वेळी मौजे चौकूळ, ता. सावंतवाडी येथे उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या 5,000 ते 6,000 एकर जमिनीवर जागतिक दर्जाचा पर्यटनविषयक विशाल प्रकल्प राबवण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राणे यांनी दिल्या. प्रकल्पामध्ये जागतिक दर्जाचा एफ-वन रेसिंग ट्रॅक आणि देशातील सर्वात मोठे गोल्फ कोर्ट तयार करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना बैठकीमध्ये राणे यांनी दिल्या.
गोल्फ कोर्ट निर्मितीचाही प्रस्ताव
सोबतच गोल्फ कोर्ट व अन्य प्रकल्प उभारता येतील का, याचीही माहिती राणे यांनी मागवली आहे. तोंडवळी येथील सी-वर्ल्ड प्रकल्प, तारकर्ली येथील स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र, ओरोस येथे पर्यटक केंद्र बांधणे इत्यादी कामांचा आढावा घेण्यात आला. मिठबाव येथील ‘तारांकित दर्जाचे पर्यटक निवास’ पर्यटन प्रकल्पाचे उद््घाटन 28 फेब्रुवारीला करण्याचेसुद्धा निश्चित झाले.