आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप: ‘सचिन... सचिन...’ हा गजर आयुष्यभर कानात दुमदुमणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या खेळपट्टीवर क्रिकेटमधील कर्तृत्वाचा हिमालय उभा केला, ती माती त्याने कपाळाला लावली. ज्या भूमातेने त्याची कारकीर्द फुलवली, त्या भूमीला वंदन करून शतकातला विक्रमादित्य निवृत्तीच्या क्षितिजावर अंतर्धान पावला. ज्या खेळपट्टीवरून कारकीर्द सुरू झाली, त्या वानखेडेच्या खेळपट्टीला त्याने आपल्या अश्रूंची फुले वाहिली. अखेरचा अलविदा करून सचिन रमेश तेंडुलकर ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि तेथे त्याने आपल्या भावनांना अश्रूंच्या रूपाने वाट मोकळी करून दिली. 22 यार्डांच्या खेळपट्टीवर तब्बल 24 वर्षे न वितळलेला हा निश्चयाचा महामेरू समारोपाच्या भाषणात म्हणाला...
22 यार्डांवरचा गेल्या 24 वर्षांचा प्रवास आज संपला. या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मदत केली, सहकार्य दिले, मार्गदर्शन केले त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी आज मी प्रथमच एक यादी घेऊन बोलण्यासाठी उभा आहे.
सर्वप्रथम आभार माझ्या वडिलांचे; त्यांनी मला जी शिकवण दिली, त्यामुळेच आज मी या उंचीपर्यंत पोहोचू शकलो. त्यांनी मला सांगितले होते, स्वप्नांचा पाठलाग कर! त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी कोणताही ‘शॉर्टकट’ वापरू नकोस! आणि कधीही आपल्या प्रयत्नांमध्ये हार मानू नकोस! प्रत्येक वेळी स्वप्न किंवा धेयपूर्तीनंतर वडिलांचे मी त्या शिकवणीसाठी आभार मानतो.
०नंतर माझ्या आईचे आभार. माझ्यासारख्या खोडकर, खट्याळ मुलाला तिने कह्यात ठेवल्याबद्दल, प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळण्याइतपत मला तंदुरुस्त ठेवल्याबद्दल. माझी कारकीर्द 24 वर्षांची असली तरीही ती त्या आधीपासून माझी काळजी घ्यायची. माझ्यासाठी सतत प्रार्थना करायची. त्या प्रार्थनांमुळेच आज यशाच्या एवढ्या पाय-या मी चढू शकलो.
०मी शाळेत असताना काका-काकूंकडे वाढलो. शिवाजी पार्कला क्रिकेट खेळण्यासाठी सोयीचे जावे यासाठी मी त्यांच्याकडे राहत होतो. त्यांनी मला पोटच्या पोरासारखे वाढवले, जपले. मी खेळून आलो आणि थकून झोपलो, तरीही जागे झाल्यानंतर घास भरवले.
०मोठा भाऊ नितीन आणि बहीण सविता यांनी मला सतत प्रोत्साहन दिले, ज्या वेळी मी क्रिकेटची मुळाक्षरे गिरवत होतो. सविताने मला पहिली बॅट आणून दिली.
०माझा भाऊ अजित आणि मी आम्ही दोघांनी एकच स्वप्न पाहिले; मी क्रिकेटपटू होण्याचे. त्यासाठी अजितनेच पुढाकार घेऊन माझी सर्व व्यवस्था केली. वयाच्या 11व्या वर्षी अजितच मला आचरेकर सरांकडे घेऊन गेला. तेथूनच आयुष्य बदलले. अजित आणि माझे त्या काळीही फलंदाजीच्या तंत्राबाबत एकमत व्हायचे नाही. मी त्याच्याशी सहमत होत नव्हतो; परंतु अजितचे मार्गदर्शन मला त्या वेळी उपयोगी पडले.
०1991ला मला अंजली भेटली अन् आयुष्यच पालटले. तिने घराकडे लक्ष दिल्यामुळेच मी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकलो. माझा राग-लोभ सहन करत तिने मला सांभाळून घेतले. सारा आणि अर्जुन हे दोन हिरे माझ्या आयुष्यात आले. या दोघांना क्रिकेटमुळे मी फारसा वेळ देऊ शकलो नाही. त्यांनीही मला समजून घेतले. मेहता या माझ्या सासू-सास-यांनी अंजलीसारखी गुणवान पत्नी दिली. त्यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
०बालमित्रांचे आभार किती मानू. त्यांनी मला अडचणीच्या प्रसंगी, खडतर प्रसंगांत मदत केली. या सर्व मित्रांशिवाय माझे आयुष्य पूर्ण झाले नसते.
०सर्वात मोठे आभार आचरेकर सरांचे. माझा अखेरचा सामना पाहण्यासाठी ते स्टेडियमवर आले, हे पाहून मी आनंदलो. त्यांचे मार्गदर्शन, शिकवण आणि शिस्तच माझ्या आयुष्याची घडी बसवू शकली. त्यांचे ‘वेल प्लेड’ हे शब्द मला खूपच प्रेरणा द्यायचे. मी 11-12 वर्षांचा असल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनखाली खेळू लागलो. मला क्रिकेट सामने अधिकाधिक खेळण्याचा सराव व्हावा यासाठी ते स्कूटरवरून मला शिवाजी पार्कवरून आझाद मैदानावर घेऊन जायचे. ते क्षण अविस्मरणीय आहेत.
०माझे क्रिकेट याच वानखेडे स्टेडियमवर सुरू झाले. त्यामुळे एमसीए मला अतिशय जवळची वाटते. भारतासाठी खेळण्याची संधी देणा-या बीसीसीआयचेही आभार. मार्गदर्शन करणा-या सीनियरर्सचेही आभार.
०राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, अनिल कुंबळे आदी समकालीन क्रिकेटपटूंनी माझ्या कुटुंबीयांची भूमिका बजावली. त्यामुळे कारकीर्दीत घरापासून दूर असल्याचे जाणवलेच नाही.
०शेवटी सचिन म्हणाला, ‘मला जेव्हा 200 कसोटी खेळल्याबद्दल बीसीसीआयने विशेष कॅप दिली, त्या वेळी माझ्या छोटेखानी भाषणात मी सर्व खेळाडूंना म्हणालो, ‘आपण सर्व जण खूप भाग्यवान आहोत की, आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करत आहोत. आपल्या देशाच्या संघाचा एक भाग आहोत, याचा कधीही विसर पडू देऊ नका. योग्य नीतिमूल्ये जपा, योग्य त्या मार्गाने ती जपा.’
सचिनने त्याला फिट ठेवणा-या डॉक्टर्स, फिजिओ यांचे, तर सतत
प्रसिद्धीच्या झोतात ठेवणा-या प्रसिद्धी माध्यमांचे आभार मानले.