आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farewell To Sachin: He Give Contribution To Social Service Medha Patkar

निरोप सचिनला: आता त्याने समाजसेवेसाठी योगदान द्यावे - मेधा पाटकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन रमेश तेंडुलकर हे नावच खूप मोठे आहे. मी प्रत्यक्ष कधीही सचिनला भेटलेली नाही. मात्र, त्याचे कुटुंबीय माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. तेंडुलकर कुटुंबाला मी अगदी सुरुवातीपासून ओळखते. त्याचे वडील रमेश तेंडुलकर माझ्या परिचयाचे होते. ते कविता लिहायचे. इतकेच नव्हे, तर सचिनची सासू अनाबेल मेहता यांच्याशी माझे खूप जुने ऋणानुबंध आहेत. अनाबेल मेहता यांच्या ‘अपनालय’मध्येच मी पहिली नोकरी केली होती. माझ्या समाजसेवेच्या व्रताला ‘अपनालय’मधूनच सुरुवात झाली. मेधा पाटकर या नावाला ओळख तेथेच मिळाली. ‘अपनालय’ आणि अनाबेल मेहता यांच्याबद्दल माझ्या मनात खास जागा आहे. आदराचे स्थान आहे.
अनाबेल मेहता यांच्याशी मी आजही संपर्कात असते. समाजसेवेत त्यांचे योगदान मोठे आहे. मी त्यांना भेटून सचिनसाठी खास संदेश देणार आहे. तो संदेश सचिनपर्यंत पोहोचला पाहिजे, याची काळजीसुद्धा मी घेईन. सचिनने क्रिकेटच्या निवृत्तीनंतरचे आपले जीवन आता देशासाठी, समाजासाठी दिले पाहिजे, असे मला वाटते. मी अनाबेल मेहता यांना भेटून सचिनसाठी अशी खास विनंती करणार आहे.
सचिनला मानणारे हजारो युवक आहेत. त्याच्या शब्दाला जागणारे कोट्यवधींच्या संख्येत आहेत. आज तो युवकांचा रोलमॉडेल आहे. देशाचे भविष्य बदलण्याची ताकद युवकांच्या हातात असते. या युवकांना प्रेरित करून, योग्य कार्यासाठी आवाहन करून सचिन समाजकार्यात योगदान देऊ शकतो.
व्यसनमुक्तीसाठी लढा गरजेचा
युवकांचेही अनेक प्रश्न आहेत. व्यसनमुक्ती हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे मला वाटते. देशातील कोट्यवधी युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सचिन आवाहन करू शकतो. आधुनिकतेच्या, फॅशनच्या नावाखाली अनेक तरुण, तरुणी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे आपल्याला दिसून येते. देशाचे भविष्य युवकांच्या हाती आहे. युवकांची शक्ती सन्मार्गाला लागली, ते सत्कार्यासाठी कामी आले तर देशाचे कल्याण होईल. युवा शक्ती भरकटली तर देशाचेच सर्वाधिक नुकसान होईल. या युवकांना एका चांगल्या ध्येयासाठी, लक्ष्यासाठी प्रेरित करण्याचे आणि व्यसनमुक्त करण्याचे काम सचिन तेंडुलकर करू शकतो. त्याने असे करायला हवे, असे मला वाटते.
दीनदुबळ्यांच्या हिताचे प्रश्न सचिनने सोडवावेत. अशा सामान्य माणसाला न्याय मिळवूण देणे, त्याच्या सन्मानासाठी, हितासाठी लढणे हेसुद्धा समाजकार्य, देशकार्यच आहे. आता निवृत्तीनंतर त्याच्या हातून देशकल्याणकारी कार्य घडो, हीच मनस्वी सदिच्छा...!!!
भ्रष्टाचारमुक्तीसाठी सचिनने लढावे
सचिनने भ्रष्टाचारमुक्तीसाठी पुढे आले पाहिजे. त्याने युवकांना भ्रष्टाचाराविरोधात एक जरी आवाहन केले तर खूप मोठा बदल होणे शक्य आहे. ‘तुम्ही शंभर रुपये कमावले तर त्या शंभर रुपयांतच तुमची गरज भागवा. अतिरिक्त पैसे गैरमार्गाने कमावण्याचा विचारसुद्धा करू नका. कोणी असे करीत असेल तर त्याला विरोध करा’..अशा शब्दांत सचिनने युवकांना आवाहन केले तर देशाचे चित्रच बदलेल.