आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप सचिनला: प्रत्येक धावेवर टाळ्यांचा गजर, विंडीजचा 182 धावांत खुर्दा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोठे कलाकार समारोपाची कलाकृती सादर करण्यासाठी मोठ्या व्यासपीठाची नेहमीच निवड करतात. फलंदाजीच्या कौशल्याची आपली अखेरची मैफल सादर करण्यासाठी सचिन तेंडुलकरने आपल्या 200व्या कसोटीचे व्यासपीठ निवडले. भात्यातील अप्रतिम अस्त्रांचे प्रयोग त्याने विंडीज गोलंदाजीवर केले. त्याच्या प्रत्येक धावेवर चाहत्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याला जबरदस्त साथ दिली. सॅमीच्या गोलंदाजीवर अस्ताला चाललेल्या सूर्याच्या साक्षीने मारलेला ऑन ड्राइव्ह ऐन भरातील सचिनची आठवण करून देत होता. वेस्ट इंडीजचा धोकादायक फिरकीपटू ऑफस्पिनर शिलिंगफोर्डला कव्हर, एक्स्ट्राकव्हर्स पट्ट्यातून सीमापार पाठवतानाही त्याची सफाई त्याच्या ऐन उमेदीच्या काळाची आठवण करून देत होती.
त्यामुळे भारताने आज विंडीजचा डाव 55.2 षटकांत 182 धावांत गुंडाळल्यानंतर दिवसअखेर 2 बाद 157 अशी दमदार मजल मारली होती. 77 धावांची सलामी देणा-या शिखर धवन (33) आणि मुरली विजय (43) यांच्या विकेटचे सर्व प्रेक्षकांनी स्वागत केले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सचिनला प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली.
शिलिंगफोर्डने एकाच षटकात भारताची जोडी तंबूत पाठवली आणि अचानक विंडीजच्या गोलंदाजीत जान आली. दिवसअखेरच्या त्या कठीण, खडतर कालखंडात पुजाराच्या साथीला खेळण्यासाठी सचिन मैदानात उतरला. सकाळी 9.30 वाजेपासून तमाम प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर प्रत्यक्षात अवतरला होता.
वातावरणाचे, अपेक्षांचे आणि अखेरच्या कसोटीत खेळत असल्याचे दडपण घेऊन सचिन मैदानात उतरला होता. मोठ्या खेळाडूला अशा आव्हानात्मक परिस्थितीतच सर्वोत्तम कामगिरी करायला आवडते. सचिनने आव्हान स्वीकारले. शिलिंगफोर्डला बॅकफूट कव्हर ड्राइव्ह आणि एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्हज्चे दोन चौकार मारून त्याने विंडीजच्या फिरकी गोलंदाजाने निर्माण केलेला बागूलबुवा नष्ट केला.
ओझा चमकला
त्यापूर्वी प्रज्ञान ओझाने 40 धावांत 5, तर अश्विनने 45 धावांत 3 बळी घेत वेस्ट इंडीज संघाचा डाव 182 धावांत गुंडाळला. 40 ते 55 षटकांदरम्यान वेस्ट इंडीज संघाचा डाव कोसळला. प्रज्ञान ओझाच्या फिरकीच्या कौशल्यापेक्षाही वेस्ट इंडीज फलंदाजांचे फिरकी खेळण्याचे दुबळे तंत्र आज उघडे पडले. वेस्ट इंडीज संघातर्फे सर्वाधिक 48 धावा पॉवेलने काढल्या. इतर फलंदाजांनी भारतापुढे गुडघे टेकले.
आता शतकाची प्रतीक्षा
सचिनने ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या युगात कसोटी क्रिकेट कसे संयमाने आणि तंत्रशुद्ध बचावाने खेळावे, याचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रत्येक प्रेक्षक दिवसअखेरच्या चेंडूच्या प्रतीक्षेत होता. सचिनने तो खेळून काढला आणि सलामीच्या दिवसाच्या सचिनमय झालेल्या मैफलीवर पडदा पडला. उद्या वेस्ट इंडीज संघावर भारत पहिल्या डावात किती धावा काढतो, यापेक्षा सचिनच्या फलंदाजीची आपल्या आईसमोरील अखेरची मैफल किती रंगते, याचीच क्रिकेट रसिकांना उत्सुकता आहे.
अश्विन सर्वात वेगवान शिकारी
जगातील नंबर वन ऑलराउंडर आर.अश्विनने गुरुवारी सचिनच्या 200 व्या कसोटीचा आनंद एका अपूर्व कामगिरीने साजरा केला. त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध दुस-या कसोटीत आपल्या 100 विकेट पूर्ण केल्या. 18व्या कसोटीत ही किमया साधली.
धोनीचे 250 झेल
सचिनच्या ऐतिहासिक कसोटीत सर्वच खेळाडू विशेष कामगिरीसाठी प्रयत्नशील आहेत. यामध्ये धोनीही मागे नाही. त्याने या सामन्यात 250 वा झेल घेतला. त्याने आतापर्यंत 79 कसोटीत 215 झेल आणि 36 यष्टिचीत केले आहेत.
धावफलक
वेस्ट इंडीज (पहिला डाव) धावा चेंडू 4 6
गेल झे.शर्मा गो. शमी 11 17 1 0
पॉवेल झे.धवन. गो.ओझा 48 80 4 1
ब्राव्हो झे.धोनी गो.अश्विन 29 63 5 1
सॅम्युअल्स झे.विजय गो. ओझा 19 59 3 0
चंद्रपॉल झे.अश्विन गो. कुमार 25 34 2 1
देवनारायण झे.विजय गो. अश्विन 21 24 1 1
रामदीन नाबाद 12 32 2 0
सॅमी झे.शर्मा गो.अश्विन 0 2 0 0
शिलिंगफोर्ड पायचित ओझा 0 6 0 0
बेस्ट झे.धोनी गो. ओझा 0 2 0 0
गॅब्रिएल झे.धोनी गो.ओझा 1 13 0 0
अवांतर : 16. एकूण : 55.5 षटकांत सर्वबाद 182 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-25, 2-86, 3-97, 4-140, 5-148, 6-162, 7-162, 8-162, 9 -172, 10-182. गोलंदाजी : भुवनेश्वर 17-2-45-1, मो.शमी 12-2-36-1, अश्विन 15-2-45-3, ओझा 11.2-2-40-5
भारत पहिला डाव धावा चेंडू 4 6
विजय झे.सॅमी गो.शिलिंगफोर्ड 43 55 8 0
धवन झे.चंद्रपॉल गो.शिलिंगफोर्ड 33 28 7 0
चेतेश्वर पुजारा नाबाद 34 49 4 0
सचिन तेंडुलकर नाबाद 38 73 6 0
अवांतर : 9. एकूण : 34 षटकांत 2 बाद 157 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-77, 2-77. गोलंदाजी : सॅमी 6-0-27-0, गॅब्रिएल 6-0-32-0, शिलिंगफोर्ड 12-1-46-2, बेस्ट 5-0-27-0, सॅम्युअल्स 5-0-17-0.