आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडरर, वोज्नियाकी, नदाल विजयी! ; सानिया पहिल्या फेरीतच गारद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - माजी चॅम्पियन रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनी वर्षाची पहिली ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत विजयी प्रारंभ केला आहे. महिला एकेरीत अव्वल मानांकित कॅरोलिन वोज्नियाकी आणि गतचॅम्पियन किम क्लिजस्टर्स यांनीही विजय मिळवून दुसरी फेरी गाठली आहे.
चार वेळेसचा चॅम्पियन रॉजर फेडररने सोमवारी येथे रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर कुद्रियात्सेव याला पराभूत केले. तिसरा मानांकित फेडररने ही लढत 7-5, 6-2, 6-2 ने जिंकली. दुसरा मानांकित स्पेनच्या राफेल नदालने अमेरिकेच्या अ‍ॅलेक्स कुजनेत्सोव याला 6-4, 6-1, 6-1 ने नमवले. दुसरीकडे 22 वा मानांकित फर्नांडो वर्दोस्को, जर्गेन मेल्जर यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. स्पेनच्या वर्दास्कोला ऑस्ट्रेलियाच्या बर्नाड टॉमिचने 4-6, 6-7, 6-4, 6-2, 7-5 ने पराभूत केले. ऑस्ट्रियाच्या मेल्जरला क्रोएशियाच्या इवो कार्लोविचने 7-6, 7-5, 6-3 ने स्पर्धेबाहेर केले.
लिना, अजारेंका दुस-या फेरीत
महिला एकेरीत डेन्मार्कच्या वोज्नियाकीने ऑस्ट्रेलियाच्या अनास्तासिया रोडिनोवाला 6-2, 6-1 ने तर बेल्जियमच्या क्लिजस्टर्सने पोर्तुगालच्या मारिया जाओ हिला 7-5, 6-1 ने नमवले. गतउपविजेती चीनच्या लिना हिने कजाकिस्तानच्या सेनिया पेरवाकला 6-3, 6-1 ने, तर तिसरी मानांकित बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाने इंग्लंडच्या हिथन वॉटसनला 6-1, 6-0 ने हरवले. 19 वी मानांकित इटलीच्या फ्लेविया पेनेटा आणि 24 वी मानांकित चेक गणराज्यच्या लुसी सॅफारोवा यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पेनेटाला रशियाच्या निना ब्रात्चिकोवाने 6-3, 1-6, 6-2 ने, तर सॅफारोवाला अमेरिकेच्या क्रिस्टिना मॅकहॅलने 6-2, 6-4 ने पराभूत केले.
सानियाचे आव्हान संपुष्टात
सानिया मिर्झाच्या पराभवासह महिला एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. बिगरमानांकित सानिया मिर्झाला बल्गेरियाच्या स्वेताना पिरोनकोवाने 88 मिनिटे चाललेल्या लढतीत 6-4, 6-2 ने पराभूत केले. सानिया मिर्झाने पहिल्या फेरीत थोडा संघर्ष केला. मात्र, दुस-या सेटमध्ये तिला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. वर्षाच्या पहिल्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत दमदार प्रदर्शनाने सुरुवात करण्याचे सानिया मिर्झाचे स्वप्न या पराभवामुळे संपुष्टात आले. सानियाला या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला होता, हे विशेष.

पहिल्या फेरीतील विजेते - पुरुष एकेरी
विजेता विरुद्ध विजय
टॉमस बर्डिच अल्बर्ट रामोस 7-5, 4-6, 6-2, 6-3
डी. नालबांडियन जारको निमिनेन 6-4, 4-2 (निवृत्त)
स्तानिस्लास वावरिंका बेनाएत पायरे 6-1, 6-1, 7-5
मार्डी फिश जाइल्स म्युलर 6-4, 6-4, 6-2
जॉन इस्नर बेंजामिन मिशेल 6-4, 6-4, 7-6
निकोलस अलमाग्रो लुकास कुबोत 1-6, 7-5, 6-3, 7-5
जुआन मार्टिन डेल पात्रो 2-6, 6-1, 7-5, 6-4
फेलिसियानो लोपेज लियोनार्डोे मेयर 7-5, 6-3, 7-6

महिला एकेरी
विजेती विरुद्ध विजय
अ‍ॅग्निस्जका राद्वस्का बेथानी माटेक सँडस् 6-7, 6-4,
फ्रान्सिस्का शियावोन पॉस टियो लाऊरा 6-1, 6-3
जेलेना जांकोविच लाऊरा रॉब्सन 6-2, 6-0
पेंगु शुआई अरावने रेजाई 6-3, 6-4
डॅनियला हंचुकोवा वारवरा लेप्चेंको 4-6, 6-3, 6-2
ज्युलिया जॉर्जेस पोलोना हरकाँग 6-3, 7-6

मार्चमध्ये टेनिसपटू जाणार संपावर!
मेलबर्न-ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत सहभागी झालेल्या अव्वल मानांकित टेनिसपटू बक्षिसांच्या रोख रकमेत वाढवण्यासाठी मार्च महिन्यात संपावर जाणार आहे. चार गॅ्रण्ड स्लॅम, आठ मास्टर्स व वर्ल्ड टूर फायनल्स या स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्याची मागणी या टेनिसपटूंनी केली आहे. युक्रेनच्या सर्गेई स्टकोवस्कीच्या उपस्थितीत एटीपी सदस्य खेळाडूंची नुकतीच बैठक झाली. हे खेळाडू ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेवर बहिष्कार टाकणार होते. मात्र वेळेवर निर्णय घेऊन हा संप मार्च महिन्यात करण्यावर एकमत झाले. या संपामध्ये राफेल नदाल, नोवाक जोकोविचसारखे अव्वल मानांकित टेनिसपटू सहभागी होणार आहेत. एटीपीने 2012-14 दरम्यान बक्षिसाच्या रकमेत 20 टक्के वाढ करण्याचे आश्वासन दिले होते.