मियामी- घाना संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीसाठी रंगलेल्या सराव सामन्यात दक्षिण कोरियाचा 4-0 ने पराभव केला. जॉर्डन अयेवने (11, 53, 89 मि.) केलेल्या हॅट्ट्रिकी गोलच्या बळावर घानाने शानदार विजय मिळवला. तसेच ग्यानने (44 मि.) संघाच्या विजयात एका गोलचे योगदान दिले. यासह घानाच्या फुटबॉल संघाने दमदार विजयाने वर्ल्डकपमधील आपल्या मोहिमेला सुरुवात करण्याचे संकेत दिले. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जी गटात घाना संघाचा समावेश करण्यात आला. याच गटात
क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालसह अमेरिका आणि जर्मनी संघदेखील सहभागी आहेत. घाना संघ वर्ल्डकपमध्ये 16 जून रोजी अमेरिकेविरुद्ध सामन्यातून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. मियामीच्या सन लाइफ स्टेडियमवर घाना आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.
माजिद बाहेर; जॉर्डनला संधी
घानाच्या टीमला चौथ्या मिनिटाला फॉरवर्ड माजिद वारीस दुखापतग्रस्त झाल्याने धक्का बसल. मात्र, त्यानंतर त्याच्या जागी आलेल्या जॉर्डन अयेवने टीम व्यवस्थापकांनी ठेवलेला विश्वास गोलची हॅट्ट्रिक करून सार्थकी लावला. घानाच्या 22 वर्षीय जॉर्डनने दमदार सुरुवात करताना अवघ्या 11 मिनिटांमध्ये टीमकडून गोलचे खाते उघडले. यासह घाना संघाने स्पर्धेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर 44 व्या मिनिटाला ग्यानने गोल करून घानाच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. या गोलसह घानाने मध्यंतरापर्यंत आपला दबदबा कायम ठेवला. दरम्यान, कोरियाने बरोबरी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, या खेळाडूंना अपेक्षित यश मिळाले नाही.
घानाला मागील सराव सामन्यात हॉलंडने पराभूत केले होते. या टीमने लढतीत 1-0 ने विजय मिळवला होता.