मैदानावर उतरताच विजयाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा युरोपातील जर्मनी हा एकमेव संघ आहे. या संघाच्या नावे ही ख्याती आहे. पश्चिम जर्मनीच्या या टीमने आतापर्यंत तीन वेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे. यात 1954, 1974 आणि 1990 चा समावेश आहे. मात्र, आता जर्मनीला पहिल्या किताबाची आशा आहे. मॅनेजर जोकिम लो यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपदाची ही प्रतीक्षा आता लवकरच संपेल, असा अनेक तज्ज्ञांचा दावा आहे. तसेच कोणत्याही मोठ्या स्पर्धेसाठी देशाबाहेर रवाना झालेला जर्मनी हा सर्वात मजबूत संघ आहे, असेही मत काही तज्ज्ञांनी मांडले आहे. मात्र, ब्राझीलच्या वातावरणात मिसळण्यासाठी जर्मनीला फारच कमी वेळ मिळाला असल्याचेही काही जणांचे मत आहे. जर्मनीचा संघ शनिवारी ब्राझीलमध्ये दाखल झाला आहे. चांगली कामगिरी करून सामन्याला कलाटणी देण्याची क्षमताही संघात आहे. चमत्कारासाठी संघाचे खेळाडू सज्ज झाले आहेत.
प्रभावी डावपेच
जर्मनी टीम 4-2-3-1 अशा डावपेचांसह मैदानावर उतरते. यामुळे या टीमचे आक्रमण अधिक मजबूत बनते. तसेच वेळ पडल्यास खेळाडू डिफेन्ससाठीही मदत करतात. बास्तेन श्विन्सटायगर आणि सॅमी खेदिरा मिडफील्डवर राहून संघाचे संतुलन कायम ठेवण्यास मदत करतात.
जर्मनी टीमची सर्वात मोठी बाजू दमदार आक्रमण असल्याचे मानले जाते, यात कोणतीही शंका नाही. ओझिल हा आक्रमणामध्ये सर्वांचे नेतृत्व करतो. थॉमस युलरही अधिक धोकादायक खेळाडू मानला जातो. ज्युलियन डॅक्सटर, टोनी क्रुस आणि आंद्रे शरले हे त्रिकूटही उल्लेखनीय कामगिरी करण्यात तरबेज आहे.
दबावात दुबळा डिफेन्स
गेल्या वर्षभरापासून जर्मनीच्या टीमचा दबावादरम्यान डिफेन्स फारच दुबळा होऊन जातो. जेव्हा संघामध्ये जगातील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक मॅन्युअल नेऊर नसतो, त्याच वेळेस जर्मनीला अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. सॅमी खेदिरा आणि श्विन्सटायगर नुकतेच दुखापतीमधून सावरले आहेत. ओझिलही फॉर्मात येण्यासाठी सज्ज आहे.