आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-ऑस्ट्रेलिया आज सातवा वनडे; लक्ष्य मालिका विजयाचे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका विजयाचा धमाका उडवण्यासाठी सज्ज झाला आहे. शनिवारी भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिकेतील शेवटचा व सातवा एकदिवसीय सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ मालिकेवर आपले नाव कोरणार आहे. सात वनडे सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 2-2 ने बरोबरी मिळवली आहे. या सातव्या प्रतिष्ठेच्या सामन्यासाठी भारत व ऑस्ट्रेलिया टीमने शुक्रवारी कसून सराव केला.

आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघ दुस-या स्थानी आहे. या दोन्ही तुल्यबळ टीममध्ये झालेल्या वनडे सामन्यांचा चाहत्यांनी मनसोक्त आनंद लुटला. भारताने नागपूर येथे बुधवारी सहाव्या वनडेत खडतर 351 धावांचे लक्ष्य गाठून मालिकेत 2-2 ने बरोबरी मिळवली. यासह भारताने मालिकेत दुस-यांदा 350 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले आहे.

दोन्ही टीम तुल्यबळ
भारत व ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची जोरदार चर्चा आहे. भारताकडून विराट कोहली, धवन, रोहित आणि धोनीने शतक ठोकून स्वत:ला सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेली आणि शेन वॉटसननेही नागपुरात शतक झळकावले. बेलीने एक शतक आणि तीन अर्धशतकांसह मालिकेत सर्वाधिक 474 धावा काढल्या आहेत.

शिखर, रोहितचा दबदबा
भारताच्या सलामीवीर रोहित व शिखर धवन या जोडीने स्वत:ला सिद्ध केले आहे. या दोघांच्या कामगिरीने भारताने मालिकेत आपला दबदबा निर्माण केला आहे. जयपूर व नागपूरमध्ये या जोडीने मोठी भागीदारी केली. आता बंगळुरूतही ही जोडी अव्वल कामगिरी करण्याची शक्यता आहे.



गोलंदाजीत दुबळी बाजू
मालिकेत आतापर्यंत फलंदाजांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. मात्र, अद्याप गोलंदांज मालिकेत छाप पाडू शकले नाहीत. दोन्ही टीमचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. बंगळुरूतही यापेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडियाने गत सामन्यात अमित मिश्राला संधी दिली होती. मात्र, त्याने दहा षटकांत 78 धावा दिल्या. त्याला एकही गडी बाद करता आला नाही. भुवनेश्वरकुमारने 42 धावा आणि शमीने आठ षटकांत 66 धावा दिल्या. एकूणच भारताच्या गोलंदाजांना आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेण्याची ही शेवटची संधी आहे.