आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या रांचीत टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत; नरेंद्र मोदींमुळे वाद चिघळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- कोचीत इंग्लंडवर १२७ धावांनी दणदणीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधणा-या टीम इंडियाचे आज झारखंडची राजधानी रांचीत जल्लोषात स्वागत होणार आहे. याची तीन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण पाच सामन्याच्या मालिकेत भारताने बरोबरी साधली आहे. तसेच टीम इंडिया रांचीत पहिल्यादांच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे व तिसरे म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा शहरातील आहे.
पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना तोही आपल्या शहरातील खेळाडूच्या नेतृत्त्वाखाली होत असल्याने रांचीकर व संपूर्ण झारखंडमध्ये उत्साह आहे. असे असले तरी राजकीय संकट ओढवलेल्या झारखंडमध्ये यावरुनही राजकारण सुरु झाले आहे.
झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन (जेएससीए)ने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केल्याने काँग्रेसने याला कडवा विरोध केला आहे. काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे की, ''गुजरात दंगलीतील आरोपीला प्रमुख पाहुणे बनविले गेले आहे. तर, दुसरीकडे राज्‍यातील ख-या हिरोंकडे दुर्लक्ष केले आहे. जेएससीएने झारखंड भूमीचा व तिच्या रक्षणासाठी शहीद झालेल्यांचा अपमान केला आहे.''
काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी शहरातील अलबर्ट एक्का चौकात जेएससीएचे चेअरमन अमिताभ चौधरी यांचा पुतळा जाळला व नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या.
भारत आणि इंग्लंड यांच्यात शनिवारी (१९ जानेवारी) एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना खेळविण्यात येणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी नव्याने बांधण्यात आलेल्या जेएससीए स्टेडियमचे उद्घाटन होणार आहे. यात प्रमुख पाहुणे म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (जे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत) यांना आमंत्रित केले आहे. शुक्रवारी जेएससीए स्टेडियमचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे. झारखंडचे राज्यपाल डॉ. सय्यद अहमद या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. विशेष प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच झारखंडचे काळजीवाहू मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी, शिबू सोरेन, बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन उपस्थित राहणार आहेत.