अॅडिलेड - पहिल्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलिया संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. सामन्याच्या दुस-या दिवशी कर्णधार मायकेल क्लार्क (१२८) आणि स्टीव्हन स्मिथ (नाबाद १६२) यांनी शतके ठोकताना संघाची धावसंख्या ७ बाद ५१७ धावांपर्यंत पोहोचवली. या दोन्ही फलंदाजांनी शतके ठोकल्यानंतर
आपला दिवंगत सहकारी फिलिप ह्यूजचे स्मरण करताना आकाशाकडे बघून बॅट उंचावत आपले हे शतक त्याला समर्पित केले. क्लार्कचे हे २८ वे, तर स्मिथचे हे पाचवे कसोटी शतक आहे. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १६३ धावांची भागीदारी करून सामन्याचे चित्र बदलले. पावसामुळे खेळात व्यत्यय जरूर आला. मात्र, ऑस्ट्रेलियाने वेगवान खेळ करून पाचशे धावांचा टप्पा ओलांडला.
क्लार्क आणि स्मिथ यांनी दुस-या दिवशी भारतीय गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. बुधवारचा खेळ थांबला त्या वेळी स्टीव्हन स्मिथ १६२ आणि मिशेल जॉन्सन शून्यावर खेळत होते. तत्पूर्वी, सकाळी ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात मंगळवारी ६ बाद ३५४ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्या वेळी स्मिथ ७२ धावांवर खेळत होता. सामन्यात सकाळच्या सत्रात काही तासांचा खेळ होताच वरुणराजाचे आगमन झाले. पावसामुळे खेळ थांबला. थोड्या वेळाने सामना पुन्हा सुरू झाला. जेवणाचा ब्रेकसुद्धा निर्धारित वेळेच्या आधी करावा लागला. स्मिथने २३१ चेंडूंचा सामना करताना २१ चौकारांच्या साहाय्याने नाबाद १६२ धावा काढल्या. क्लार्कनेसुद्धा स्नायू दुखावल्यानंतरही शानदार खेळी केली. क्लार्कने १६३ चेंडूंचा सामना करताना १८ चौकारांच्या मदतीने १२८ धावा काढल्या. स्मिथने भारतीय गोलंदाज वरुण अॅरोनच्या गोलंदाजीवर प्रेक्षणीय फटके मारले. सामना थांबला त्या वेळी स्मिथ ९८ धावांवर होता. लंचनंतर पुन्हा खेळ सुरू होताच स्मिथने पाचवे कसोटी शतक पूर्ण केले. सामन्याच्या १०४ व्या षटकात क्लार्कने आपले शतक पूर्ण केले. क्लार्कचे हे कसोटीतील २८ वे शतक ठरले. लेगस्पिनर कर्ण शर्माने चेतेश्वर पुजाराकरवी क्लार्कला झेलबाद करत ही भागीदारी मोडली. क्लार्क सातव्या फलंदाजाच्या रूपात ५१७ च्या स्कोअरवर बाद झाला. कसोटीच्या दुस-या दिवशी क्लार्कच्या रूपाने भारताला एकमेव यश मिळाले.
वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि मोहंमद शमी यांनी अत्यंत महागडी षटके टाकली. यानंतर प्रभारी कर्णधार
विराट कोहलीने काही वेळासाठी चेंडू कर्ण शर्माच्या हाती सोपवला. मात्र, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धावगती कमी होऊ दिली नाही.
कर्णने केले क्लार्कला बाद
लेगब्रेक
गुगली गोलंदाज कर्ण शर्माने दुस-या दिवशी ११ षटके गोलंदाजी करताना ५४ धावा दिल्या. त्याने क्लार्कची महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. भारताचे उर्वरित तिन्ही वेगवान गोलंदाज मोहंमद शमी, वरुण अॅरोन, ईशांत शर्मा महागडे ठरले. कर्णने सामन्याच्या पहिल्या दिवशी शतकवीर डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली होती. दोन दिवसांत दोन शतके ठोकणा-या फलंदाजांना त्याने आपल्या कसोटीत बाद केले. कर्णने चांगली गोलंदाजी केली असली तरीही तो प्रचंड महागडा ठरला आहे.
शमी, अॅरोन महागडे
कसोटी सामन्याच्या दोन दिवसांत मोहंमद शमीने १८ चौकार दिले, तर वरुण अॅरोनच्या गोलंदाजीवर २३ चौकार खेचण्यात आले. या दोघांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. कर्णने १५ आणि ईशांतने ८ चौकार दिले. आपल्या गोलंदाजीत शमीने १२० धावा, अॅरोनने १३६ धावा तर कर्ण शर्माने १४३ धावा मोजल्या. ईशांतने ८५ धावा दिल्या.
क्लार्कमध्ये दिसला स्पार्क...
अॅडिलेड ओव्हलवर मायकेल क्लार्कने शतक ठोकले. येथे हे त्याचे सातवे शतक ठरले. मंगळवारी ४४ व्या षटकात ६० च्या स्कोअरवर पाठीचे स्नायू दुखावल्यामुळे क्लार्कला मैदान सोडावे लागले होते. त्याला नाबाद रिटायर हर्ट घोषित करण्यात आले. यामुळे नंतर खेळेल की नाही याबाबत शंका होती. मागच्या तीन महिन्यांपासून क्लार्क हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त होताच. फिटनेस चाचणी पास केल्यानंतर त्याला पहिल्या कसोटीत प्रवेश मिळाला. बुधवारी मायकेल क्लार्कने वेदना सहन करताना शतक ठोकले. १०९ धावांवर पोहोचल्यानंतर पुन्हा त्याच्या पाठीचे दुखणे पुढे आले. या कसोटीनंतर पुढच्या कसोटी सामन्यांतील त्याचा सहभाग संदिग्ध मानला जात आहे.
प्रेक्षकांनी पाठ फिरवली
ऑस्ट्रेलियन संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना कसोटीला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. सामन्याला अत्यल्प प्रेक्षकांची हजेरी होती. कसोटी कार्यक्रम बदलल्यामुळे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. ह्यूजच्या निधनामुळे कसोटी मालिकेचा कार्यक्रम बदलला.
हेही आहे महत्त्वाचे
- स्मिथचे हे कारकीर्दीतील पाचवे कसोटी शतक ठरले. हे पाचही शतक त्याने क्लार्कच्या नेतृत्वाखाली झळकावले. भारताविरुद्ध हे त्याचे पहिलेच शतक आहे.
-भारताविरुद्ध यापूर्वी स्मिथची सर्वोत्तम कामगिरी २०१३ मध्ये मोहाली येथे ९२ धावा अशी होती.
-अॅडिलेड येथे ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध सातव्यांदा पाचशेपेक्षा अधिक धावांचा डोंगर उभा केला आहे. (५२७/७).
-२० षटकांपेक्षा अधिक गोलंदाजी केल्यानंतर सर्वात सुमार इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करण्याची कामगिरी वरुण अॅरोनने केली. त्याने ५.९१ च्या इकॉनॉमी रेटने (२३-१-१३६-२) गोलंदाजी केली. १९८३ मध्ये फैसलाबाद येथे पाकिस्तानविरुद्ध (३८.४-३-२२०-७) कपिलदेवने ५.६८ अशा इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली होती. वरुणने त्यापेक्षाही सुमार गोलंदाजी केली.
-ऑस्ट्रेलियाकडून भारताविरुद्ध सहाव्यांदा एकाच डावात तीन फलंदाजांनी शतके ठोकण्याची कामगिरी झाली.
-मायकेल क्लार्कने कसोटीतील २८ वे शतक ठोकले. घरच्या मैदानावर त्याने १७ शतके ठोकली आहेत.
-क्लार्कच्या १२८ धावा हे कर्णधार म्हणून त्याचे १४ वे शतक ठरले आहे. कर्णधार म्हणून क्लार्कने ४० कसोटीत ५७.३५ च्या सरासरीने ३७२८ धावा ठोकल्या.
-भारताविरुद्ध कसोटीत २ हजार धावांचा टप्पा गाठणारा क्लार्क (२०४२) रिकी पाँटिंगनंतर (२५५५) दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. भारताविरुद्ध दोन हजारपेक्षा अधिक धावा काढणा-या इतर देशांच्या फलंदाजांत क्लाइव्ह लॉइड (२३४४), जावेद मियाँदाद (२२२८) आणि शिवनारायण चंद्रपॉल (२१७१) यांचा समावेश आहे.
पुढे वाचा धावफलक