आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली कसोटी: जिंकता जिंकता हरलो..! कर्णधार कोहलीचे शतक (१४१) ठरले व्यर्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाय‍ाचित्र: विजयाची संधी नजरेसमाेर असताना ३०४ च्या स्कोअरवर बाद झाल्यानंतर निराश झालेला कर्णधार विराट कोहली.
अ‍ॅडिलेड - कर्णधार विराट कोहलीच्या (११५ आणि १४१) दोन्ही डावांतील दमदार शतकानंतरही अ‍ॅडिलेड कसोटीत भारताचा पराभव झाला. एकवेळ विजय टीम इंडियाच्या दृष्टिपथात दिसत होता. मात्र, कोहली बाद होताच भारताचा डाव कोसळला. भारताने अखेरच्या पाच विकेट अवघ्या १५ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. जिंकता..जिंकता आपण हरलो. सामन्यात कोहलीशिवाय ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (१४५ आणि १०२) दोन्ही डावांत शतक ठोकले. वॉर्नरची कामगिरी आणि ऑफस्पिनर नॅथन लॉयनच्या दुस-या डावातील ७ विकेटच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला ४८ धावांनी हरवले. यजमान संघाच्या विजयाचा हीरो लॉयनने सामन्यात एकूण १२ गडी बाद केले. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० ने विजयी आघाडी घेतली आहे. दुस-या कसोटीला १७ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे सुरुवात होईल.

ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी फलंदाजी केली नाही. कांगारुंनी शुक्रवारचा त्यांचा स्कोअर ५ बाद २९० वरच दुसरा डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ७३ धावांची आघाडी मिळवली होती. यानुसार त्यांनी भारतासमोर विजयासाठी ३६४ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, टीम इंडियाला जोरदार संघर्ष केल्यानंतर सुद्धा ३१५ धावांच काढता आल्या. चांगली सुरुवात करूनही भारताला लक्ष्य गाठता आले नाही. मधल्या फळीचे अपयश आपल्याला भोवले.

इतिहास रचण्याची संधी हुकली
विजयासाठी ३६४ धावांचे लक्ष्य मिळताच निश्चित झाले की भारताला जिंकायचे असेल तर इतिहास रचावा लागेल. कारण, अ‍ॅडिलेडवर आतापर्यंत ३१५ पेक्षा अधिक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे झाला नाही. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन या कसोटीतही अपयशी ठरला. त्याला फक्त ९ धावा काढता आल्या. जॉन्सनने त्याला यष्टिरक्षक हॅडिनकरवी झेलबाद केले. तिस-या क्रमांकावर चेतेश्वर पुजाराने २१ धावांचे योगदान दिले. त्याने ३८ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार मारले. फिरकीपटू लॉयनने त्याला यष्टिरक्षक हॅडिनकरवी झेलबाद केले. ५७ धावांपर्यंत दोन फलंदाज बाद झाले. मात्र, खेळ अद्याप शिल्लक होता. टिकून खेळणारा सलामीवीर मुरली विजयला (९९) कर्णधार कोहलीच्या रूपाने आदर्श जोडीदार मिळाला. दोघांनी तिस-या विकेटसाठी १८५ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव लवकर घोषित करून चूक केली की काय, असे त्या वेळी वाटू लागले होते. मात्र, २४२ च्या स्कोअरवर विजय नर्व्हस नाइंटीजचा बळी ठरताच टीम इंडियाचा डाव कोसळला.

रहाणे, रोहितची हजेरी
अजिंक्य रहाणे (०), रोहित शर्मा (६) आणि वृद्धिमान साहा (१३) यांनी खेळपट्टीवर फक्त हजेरी लावण्याचे काम केले. भारताला भक्कम खेळीची गरज असताना हे तिघे झटपट बाद झाले. यामुळे टीम इंडियाच अडचणीत आली. हे तिघे बाद झाल्याने कोहलीचा विश्वासही खचला. टीम इंडियाच्या ३०४ धावा झाल्या असताना कोहली बाद झाला. उर्वरित फलंदाज तर अवघ्या १० धावांच्या आत तंबूत परतले.

भारतीय फलंदाजांची हाराकिरी
धावांचा पाठलाग करताना सलामीवीर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली या दोघांना वगळता इतर फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यांनी ऑस्ट्रेलियासमोर नांग्या टाकल्या. भारताच्या ७ फलंदाजांना तर दोनअंकी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. भारताकडून शिखर धवन (९), अजिंक्य रहाणे (०), रोहित शर्मा (६), कर्ण शर्मा (४), मो. शमी (५), वरुण अ‍ॅरोन (१), ईशांत शर्मा (१) हे दोन अंकी धावसंख्या गाठू शकले नाहीत.

हेही आहे महत्त्वाचे
* कोहलीने कसोटीत (१४१) वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी केली. कसोटीत त्याची यापूर्वी सर्वोत्तम कामगिरी द. आफ्रिकेविरुद्ध २०१३ मध्ये ११९ धावा होती. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ कसोटींत चौथे शतक ठोकले.
* ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटीतील चौथ्या डावात एखाद्या भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी आता कोहलीच्या नावे जमा झाली आहे.
* नॅथन लॉयनने सामन्यात मॅचविनिंग कामगिरी करताना २८६ धावांत १२ गडी बाद केले.
लॉयनने कसोटीत पहिल्यांदा १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला. यापूर्वी त्याने भारताविरुद्ध २०१२-१३ मध्ये दिल्ली कसोटीत ९ गडी बाद केले होते.
* लॉयनने कसोटीत पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला.
* अ‍ॅडिलेडच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध ११ कसोटींत खेळताना सातवा विजय मिळवला. येथे एका सामन्यात पराभव आणि तीन लढती ड्रॉ झाल्या.
अ‍ॅडिलेड येथे ऑस्ट्रेलियाने एकूण ७३ सामने खेळले असून यात ३७ मध्ये विजय, १७ मध्ये पराभव आणि १९ लढती ड्रॉ झाल्या.
* मुरली विजयने (९९) ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ कसोटींत तिसरे अर्धशतक साजरे केले.
* मुरली विजय तिस-यांदा नर्व्हस नाइंटीजचा बळी ठरला आहे. यापूर्वी तो डर्बन येथे द. आफ्रिकेविरुद्ध २०१३ मध्ये ९७ धावांवर, तर लॉर्डसच्या मैदानावर जुलै २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ९५ धावांवर बाद झाला होता.
* मुरली विजयने कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतके ठोकण्याची कामगिरी केली.
* कसोटीत ९९ धावांवर बाद होणारा मुरली विजय दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी १९९४ मध्ये बंगळुरू कसोटीत श्रीलंकेविरुद्ध नवज्योतसिंग िसद्धू ९९ धावांवर बाद झाला होता.