अॅडिलेड - भारत आणि ऑस्ट्रेलियातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिली कसोटी अॅडिलेड ओव्हल मैदानावर ९ ते १३ डिसेंबरदरम्यान खेळवली जाईल. ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्यूजच्या मृत्यूनंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंपुढे
आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे मुख्य आव्हान या सामन्यात असेल. पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. महेंद्रसिंग धोनी संघासोबत असेल. मात्र, बोटाच्या दुखापतीतून सावरू न शकल्याने तो या सामन्यात खेळणार नाही. मालिकेतील पुढच्या लढतीत तो खेळेल.
अॅडिलेड ओव्हलवरच शेफील्ड शील्ड सामन्यादरम्यान सीन एबोटच्या बाउन्सरवर जखमी झाल्यानंतर फिलिप ह्यूजचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी पहिली कसोटी आव्हानात्मकच असेल. दोन्ही संघ मैदानावर उतरतील तेव्हा सुरुवातीला खेळाडू ह्यूजला श्रद्धांजली देतील. नंतर सामन्याला सुरुवात होईल.
विजयाची रणनीती
- फिलिप ह्यूजच्या निधनानंतरसुद्धा कांगारूंचे वेगवान गोलंदाज बाउन्सर टाकणार आहेत. वेगवान गोलंदाज शेन वॉटसनने याबाबत संकेत दिले.
- ऑस्ट्रेलियन संघ आपल्या आक्रमकतेमध्ये कमी येऊ देणार नाही.
- २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून ४-० अशा पराभवाचा हिशेब चुकता करण्यासाठी टीम इंडिया प्रयत्न करेल.
- विरोधी खेळाडू भावनात्मक संकटात असल्याने याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न टीम इंडिया करेल.
- कर्णधार विराट कोहली युवाशक्तीचा भरपूर उपयोग करून सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
पाँटिंग यशस्वी कांगारू
रिकी पाँटिंगने भारताविरुद्ध १९९६-२०१२ दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक २५५५ धावा काढल्या. यात त्याने ८ शतके आणि १२ अर्धशतके ठोकली.
कोहली ३२ वा कर्णधार
अॅडिलेड येथे विराट कोहली नेतृत्व करेल. कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा तो ३२ वा कर्णधार ठरेल. टीम इंडियाच्या मागच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात शतक ठोकणारा कोहली एकमेव भारतीय फलंदाज होता. त्याने अॅडिलेड येथे चौथ्या कसोटीत शतक झळकावले होते. अॅडिलेड ओव्हलवर क्लार्कची कामगिरी दमदार राहिली आहे. येथे त्याने ९ कसोटींत ९८.३८ च्या सरासरीने ६ शतकांसह एकूण १२७९ धावा ठोकल्या.
मी नेतृत्व करीन
होय, मी पहिल्या कसोटीत भारताचे नेतृत्व करीन. पुढच्या काही दिवसांत धोनी पूर्णपणे फिट होईल, अशी आम्ही आशा करतो. वैयक्तिक पातळीवर हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे. मी नेहमी कसोटीत खेळण्याचे स्वप्न बघायचो. आता कसोटीत भारताचे मी नेतृ़त्व करणार आहे. आक्रमक आणि नैसर्गिक खेळण्याचे माझे लक्ष्य असेल.
विराट कोहली, प्रभारी कर्णधार, टीम इंडिया.
अॅडिलेडमध्ये एकमेव विजय सौरव गांगुलीच्या नेतृत्वात
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९४८ ते २०१२ पर्यंत अॅडिलेड ओव्हल येथे १० कसोटी सामने खेळले आहेत. यात भारताला फक्त एक वेळा विजय मिळाला. येथे ऑस्ट्रेलियाने ६ विजय मिळवले, तर ३ सामने ड्रॉ झाले. भारताला येथे २००३ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली एकमेव विजय मिळाला. गांगुलीने या लढतीत दमदार शतक ठोकले होते.
दोन्ही संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, वरुण अॅरोन, ईशांत शर्मा, मोहंमद शमी, उमेश यादव, सुरेश रैना.
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), क्रिस रोजर्स, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, मिशेल मार्श, ब्रेड हॅडिन, मिशेल जॉन्सन, रेयान हॅरिस, पीटर सिडल, नॅथन लॉयन, शॉन मार्श.
सर्वात मोठा स्कोअर
329 मायकेल क्लार्क
281 व्ही.व्ही.एस. लक्ष्मण
खेळपट्टीचा अंदाज
अॅडिलेडची खेळपट्टी फलंदाज आणि फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकते. येथे भारताचा ऑफस्पिनर आर. अश्विन महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. धोनी येथे खेळणार नसल्याने वृद्धिमान साहा यष्टिरक्षण करेल.
जखमी भुवनेश्वर संघाबाहेर
टाचेच्या दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार पहिल्या दोन कसोटींत खेळू शकणार नाही. भुवीच्या अनुपस्थितीत भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा ईशांत शर्मा, वरुण अॅरोन, मोहंमद शमी आणि उमेश यादव यांच्यावर असेल. मो. शमी आणि उमेश यादव यांच्यापैकी एकाला अंतिम अकरा खेळाडूंत संधी मिळेल.
सचिन सर्वात पुढे
भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक चांगला रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सचिनची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कामगिरी अशी ....
सर्वाधिक धावा : ३६३०
सर्वाधिक शतके : ११
सर्वाधिक अर्धशतके : १६
सर्वाधिक षटकार : २४
सर्वाधिक चौकार : ४३४
सीन अॅबोट पुन्हा मैदानावर
वृत्तसंस्था | सिडनी
ज्याच्या उसळत्या बॉलमुळे फिल ह्यूजचा अंत झाला त्या सीन अॅबोटने आता मैदानावर परतण्याची तयारी सुरू केली आहे. ह्यूजच्या निधनाने धक्का बसलेल्या एबोटला न्यू साऊथ वेल्सने संघात स्थान दिले आहे. त्याच्या उसळत्या चेंडूने ह्यूजचा बळी घेतला असला तरी त्याबाबत कुणीही अॅबोटला दोषी धरलेले नाही. त्यामुळेच त्याला वेल्सच्या १२ जणांच्या संघात स्थान देण्यात आले असून शेफील्ड शिल्डमध्ये येत्या मंगळवारपासून या सामन्याला प्रारंभ होणार आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे टी-शर्ट असे ४०८ क्रमांकाचे असेल.
क्रिकेटविश्व तुझ्या पाठीशी
अॅबोटला वेल्सच्या संघात स्थान दिल्याची आणि तो या लढतीत खेळणार असल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच अनेक क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमींनी अॅबोटच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. मायकल वॉन याने सर्व क्रिकेटविश्व तुझ्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. मोजेस हेन्रिक याने एबोटला पूर्ण पाठिंबा दर्शवला.