आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Test Match Draw Between England And West Indies

जेसन होल्डरच्या शतकाने पहिली कसोटी अनिर्णीत, इंडीजच्या ७ बाद ३५० धावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉर्थ साउंड (अँटिग्वा) - जेसन होल्डरच्या (नाबाद १०३) शानदार शतकाच्या बळावर वेस्ट इंडीजने सर व्हिव्हियन रिचर्ड््स स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. या कसोटीत विंडीज टीम पराभवाच्या उंबरठ्यावर उभी होती. मात्र, त्यांनी पराभव टाळून सामना ड्रॉ केला. होल्डरला रामदीनची (५७) चांगली साथ मिळाली. दोघांनी शतकी भागीदारी करून सामन्याचे चित्र बदलवले.

इंग्लंडकडून ठेवण्यात आलेल्या ४३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॅरेबियन संघाला अखेरच्या दिवशी विजयासाठी ३४० धावांची गरज होती. मात्र, पाचव्या आणि अखेरच्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत वेस्ट इंडीजला ७ बाद ३५० धावाच काढता आल्या.

अँडरसनने बॉथमचा विक्रम मोडला
विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतरही त्यापासून दूर राहिलेल्या पाहुण्या इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसाठी हा दिवस संस्मरणीय ठरला. अखेरचा एक तासाचा खेळ शिल्लक असताना अँडरसनने रामदीनला बाद करून इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज होण्याचा मान मिळवला. अँडरसनची ही कसोटीतील ३८४ वी विकेट ठरली. त्याने इयान बॉथमच्या ३८३ विकेटचा विक्रम मोडला. तत्पूर्वी सकाळी मार्लोन सॅम्युअल्सची (२३) विकेट घेऊन बॉथमची बरोबरी केली होती.

होल्डरची झुंज
सातव्या विकेटसाठी रामदीन (५७) आणि होल्डर यांनी १०५ धावांची भागीदारी करून सामन्याचे चित्र बदलले. रामदीन बाद झाल्यानंतर केमार रोंचने नाबाद १५ धावांचे योगदान देऊन संघर्ष केला. त्याने आठव्या विकेटसाठी होल्डरसोबत ५६ धावांची नाबाद भागीदारी केली. या दोघांच्या संघर्षाने वेस्ट इंडीजचा पराभव टाळला. इंग्लंडकडून अँडरसन आणि ज्यो रुट यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. इंग्लंडने पहिल्या डावात ३९९ तर दुसऱ्या डावात ७ बाद ३३३ धावा काढून डाव घोषित केला होता. वेस्ट इंडीजने पहिल्या डावात २९५, तर दुसऱ्या डावात ७ बाद ३५० धावा काढल्या.