अॅडिलेड - डेव्हिड वॉर्नरच्या सलग दुस-या शतकाने पाहुणा भारतीय संघ पहिल्या कसोटीत बॅकफूटवर आला आहे. त्याने शुक्रवारी चौथ्या दिवशी शानदार १०२ धावांची खेळी केली. या शतकाच्या बळावर यजमान ऑस्ट्रेलिया संघाने दुस-या डावात पाच बाद २९० धावा काढल्या. याशिवाय यजमानांनी पहिल्या डावातील ७३ धावांच्या आघाडीसह आता भारतावर एकूण ३६३
धावांची आघाडी मिळवली. आता शनिवारी पाचव्या दिवशी
टीम इंडियाला पराभवाचे सावट दूर सारण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. सामना वाचवण्याचे मोठे आव्हान भारतासमोर आहे.
कसोटीचा चौथा दिवस नॅथन लॉयन आणि वॉर्नर
यांनी गाजवला. ऑफस्पिनर लियोनने पाच गडी बाद करून भारताचा पहिला डाव ४४४ धावांत गुंडाळला. यात त्याची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यानंतर सलामीवीर वॉर्नरने स्फोटक फलंदाजी केली. त्याने दुस-या डावातही शतक झळकावले. यात त्याने १०२ धावांची खेळी केली. यापूर्वी वॉर्नरने पहिल्या डावात १४५ धावा काढल्या होत्या.
‘पॉकेट डायनामाइट’
वॉर्नरच्या शतकाने ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसअखेर पाच गडी गमावून २९० धावा काढल्या.
भारताने पाच बाद ३६९ धावांवरून चौथ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. या वेळी रोहित शर्मा आणि वृद्धिमान साहाने संघाची धावसंख्या ३९९वर आणून ठेवली. यादरम्यान रोहित शर्मा बाद झाला. त्यापाठोपाठ भारतीय संघाची पडझड सुरू झाली. यासह पूर्ण संघ ४४४ धावांपर्यत मजल मारू शकला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला मोठी आघाडी घेता आली.
संयम हाच आज विजयाचा मंत्र : रहाणे
संयमी खेळी हा पाचव्या दिवशी भारतासाठी विजयाचा मूलमंत्र ठरेल, असा विश्वास संघाच्या अजिंक्य रहाणेने व्यक्त केला. चांगली सुरुवात करण्याची मिळालेली लयदेखील कायम ठेवावी लागेल. ही मानसिकदृष्ट्या सर्वांची परीक्षा आहे. टीम इंडियाचे फलंदाज यासाठी सक्षम आहेत. शनिवारी खेळाडू समाधानकारक खेळी करतील अशी आता आशा आहे, असेही रहाणे म्हणाला. ऑस्ट्रेलियाने ३६३ धावांची आघाडी घेतली आहे.
फिरकीपटूंसमोर टीम इंडिया हतबल
फिरकीपटूंच्या समोर पुन्हा एकदा टीम इंडिया हतबल झाल्याचे दिसून आले. याचा फायदा घेत ऑफस्पिनर लॉयनने पाच गडी बाद केले. यापूर्वी इंग्लंडचा ऑफस्पिनर मोइल अलीनेही याच वर्षी भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत एकूण २४ बळी घेतले होते. त्या वेळी भारताने ती मालिका गमावली होती.
वॉर्नरकडून वरुणला आव्हान!
वादाचा सामना रंगला; अॅरोन, धवनचे प्रत्युत्तर : चौथ्या दिवशी दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये वादाचा सामना रंगला होता. वरुण अॅरोनने ३३ व्या षटकात डेव्हिड वॉर्नरला त्रिफळाचीत केले. वॉर्नर पॅव्हेलियनकडे जात असताना वरुण अॅरोनने जल्लोष केला. दरम्यान, पंचांनी हा नो बॉल असल्याचा निर्णय दिला. हे पाहताच संतप्त झालेल्या वॉर्नरने अॅरोनकडे कटाक्ष टाकला आणि लगेच ‘कम ऑन, कम ऑन’ असे बोलू लागला. त्यामुळे वाद सुरू झाला. हे पाहताच
कोहलीने मध्यस्थी केली.
धवनने खोचली बाही : वॉर्नरला शांत करायचे शिखर धवनने शेन वॉटसनला सांगितले. मात्र, वॉटसन त्याला
आपले काम कर, असे म्हणाला. चिडलेल्या धवनने लगेच बाही खोचून वॉटसनकडे धाव घेतली. मात्र, पंचांनी मध्यस्थी केल्यानंतर तो स्मित हास्यासह परतला.
अँग्री यंगमॅनने केले कूलडाऊन : भारताचा
विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला अँग्री यंगमॅन म्हणून आेळखले जाते. दोघांच्या रागाचा पारा लगेच चढतो. मात्र, या वेळी निर्माण झालेल्या वादादरम्यान दोघांनीही धाडसाने शांतता निर्माण केली. या दोघांच्या मध्यस्थीने वाद पूर्णपणे निवळला.
आता क्लार्कच्या निर्णयाची प्रतीक्षा!
ऑस्ट्रेलियाने दुस-या डावात २९० धावा काढल्या. याशिवाय मोठी आघाडी मिळवली. त्यामुळे आता कर्णधार क्लार्क शनिवारी पाचव्या दिवशी काय निर्णय घेताे, हे पाहणे अधिक रोमांचक ठरेल. त्याच्या डाव घाेषित करणे किंवा खेळणे, या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
...तर भारताची खडतर वाट!
ऑस्ट्रेलियाने शनिवारी डाव घोषित केल्यास ३६४ धावांच्या प्रत्युत्तरात भारताची विजयासाठीची वाट ही फार खडतर असेल. कारण, या मैदानावर भारताने अद्याप विजयाचे एवढे मोठे लक्ष्य गाठले नाही.
हेदेखील महत्त्वाचे
-वर्षभरात दोनदा कसोटीच्या दोन्ही डावांत शतक ठोकणारा वॉर्नर जगातील पाचवा फलंदाज ठरला. त्याने अॅडिलेड
कसोटीच्या पहिल्या डावात १४५ आणि दुस-या डावात १०२ धावा काढल्या.
-वर्षभरात ६ शतके ठोकण्याचा वॉर्नरचा पराक्रम, एका वर्षात ११ सामन्यांत ९ शतके ठोकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या मोहंमद युसूफच्या नावावर.
-ईशांत शर्मा २० सामन्यांत सातव्यांदा शून्यावर बाद. यापूर्वी जहीर (२९), भागवत चंद्रशेखर (२३) व बेदी (२०) हेसुद्धा
प्रत्येकी सात वेळा बाद झाले.