आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लाइंग शीखच्या पायांची तपासणी करणार डॉक्टर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - ‘आजपर्यंत मी कुणालाच अशा प्रकारे धावताना बघितले नाही, तुम्ही धावत नव्हता, तर उडत होता. त्यामुळे आजपासून अवघे विश्व तुम्हाला शीख नव्हे, तर फ्लाइंग शीख म्हणून ओळखेल’ अशा शब्दांत पाकिस्तानचे लष्करप्रमुख अय्युब खान यांनी भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांची प्रशंसा केली होती. अय्युब खान यांच्या या प्रशंसचे आणि त्यांनी दिलेल्या उपाधीचे आज कोणाकडेही उत्तर नाही. कारण त्यांची धावगती आणि जिद्दच अशी होती की जेव्हा ते धावायचे तेव्हा मैदानावर उपस्थित प्रत्येक जण अक्षरश: तोंडात बोटे घालायचा. जखमी होऊनही तंदुरुस्ती टिकवून ठेवणे खूप कठीण बाब असते; परंतु मिल्खा सिंग यांनी प्रत्येक संकटावर मात करत नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्या तंदुरुस्तीमागील रहस्य जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे.
ऑर्थोपेडिक असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आग्य्रामध्ये 3 डिसेंबरपासून आयोजित वार्षिक संमेलनात मिल्खा सिंग उपस्थित राहणार आहेत आणि त्या वेळी त्यांच्या जीवनाशी निगडित अनेक पैलूंचा उलगडा केला जाईल. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. संजय चतुर्वेदी यांनी सांगितले की, गंभीर जखमा होऊनही मिल्खा सिंग तंदुरुस्त राहायचे. प्रत्येक स्पर्धेत ते तितक्याच जोमाने सहभागी व्हायचे. मेलबोर्न ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या काही वेळेपूर्वीच ते जखमी झाले होते. तरीसुद्धा त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला.
मिल्खा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
मिल्खा सिंग एक उत्कृष्ट खेळाडू राहिले असून त्यांचे व्यक्तिमत्त्वही इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक चढ-उतार बघितले, ब-याच अडचणींचाही सामना केला. करिअरच्या सुरुवातीस धावण्याच्या शर्यतीसाठी आवश्यक चांगल्या दर्जाचे बूट नसतानाही अनवाणी पायांनी त्यांनी धावायला सुरुवात केली. त्या त्या वेळी त्यांच्यात जो जोम होता, तो आजही कायम आहे. सध्या त्यांचे वय 78 वर्षे असून आजही ते तितकेच फिट आहेत. त्यामुळे त्यांच्या फिटनेसचे रहस्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे फिटनेस रहस्य अन्य खेळाडूंच्या कामी येऊ शकते.