सेव्हिला- लियोनेल मेसीच्या बार्सलिना टीमने ला फुटबॉल लीगमध्ये अव्वलस्थानी धडक मारली. नुकत्याच झालेल्या सामन्यात या टीमने यजमान सेव्हिला एफसीला 4-1 अशा फरकाने पराभूत केले. यासह बार्सिलोनाने ला लीगमध्ये 18 व्या विजयाची नोंद केली. बार्सिलोना आणि रिअल माद्रिदचे प्रत्येकी 57 गुण आहेत. मात्र, माद्रिदची दुसर्या स्थानी घसरण झाली.
लियोनेल मेसीने (44, 56 मि.) केलेल्या गोलच्या बळावर बार्सिलोनाने सामना जिंकला. सांचेझ (34 मि.) आणि फेब्रेगास (88 मि.) यांनीही संघाच्या विजयात प्रत्येकी एका गोलचे योगदान दिले. मोरेनोने 15 व्या मिनिटाला सेव्हिलाकडून एकमेव गोल केला.
सेव्हिलाने घरच्या मैदानावर दमदार सुरुवात करताना अवघ्या 15 मिनिटांत 1-0 ने आघाडी मिळवली. मोरेनो याने ही शानदार कामगिरी केली. मात्र, यजमान सेव्हिलाचा हा घरच्या मैदानावरचा या सामन्यातील शेवटचा गोल ठरला. बार्सिलोनाला बरोबरी मिळवण्यासाठी 34 मिनिटे झुंज द्यावी लागली. त्यानंतर सांचेझने मैदानी गोल करून बार्सिलोनाला 1-1 ने बरोबरी मिळवून दिली. त्यापाठोपाठ दहा मिनिटांत मेसीने गोल करून टीमची 2-1 ने आघाडी निश्चित केली. त्यानंतर मेसीने 56 व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा आणि टीमकडून तिसरा गोल केला.
मँचेस्टर युनायटेड-फुल्हाम लढत बरोबरीत
ईपीएलमध्ये मँचेस्टर युनायटेड- फुल्हाम रंगतदार लढत 2-2 ने बरोबरीत राहिली. बेंटने शेवटच्या मिनिटाला गोल करून फुल्हामचा पराभव टाळला. सिडवेलने (19 मि.) केलेल्या गोलच्या बळावर फुल्हामने 1-0 ने आघाडी मिळवली होती. त्यानंतर 78 व्या मिनिटाला मॅँचेस्टर युनायटेडने गोलचे खाते उघडले. वान पर्सेईने ही किमया साधली. कॅरिकने 80 व्या मिनिटाला युनायटेडकडून गोल केला.