आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या मेसीची पदवीसाठी ‘किक ऑफ’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर औरंगाबादच्या अल्पशिक्षित विशाल मगरेने फुटबॉलमध्ये ‘मेसी’ म्हणून नवीन ओळख निर्माण केली. फुटबॉलमधील उज्ज्वल भविष्यासाठी धडपडत असलेल्या त्याच्या पंखांना आता मुक्त विद्यापीठाने शिक्षणाचे बळ दिले आहे.

डॉ. कांचन देसरडा महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या विशालने पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी किक ऑफ केली. त्याने पदवी शिक्षणासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या औरंगाबाद केंद्रात प्रवेश अर्ज भरला. या वेळी विभागीय संचालक डॉ. अनिल कुलकर्णी, सहायक कुलसचिव सतीश पाटील, वरिष्ठ सहायक सतीश बोरसे, प्राचार्य हसन इनामदार, अनिल निपळुंगे, प्रशिक्षक मो. शेख उपस्थित होते.

देसरडा महाविद्यालयाने घेतली वृत्ताची दखल : गत 9 जुलै रोजी ‘दिव्य मराठी’ दैनिकात ‘टी-बॉय टू औरंगाबादचा मेसी’ या शीर्षकाखाली विशाल मगरेच्या संघर्षमय प्रवासासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले. गरिबीमुळे त्याला अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागले. मात्र, आता 18 वर्षीय विशालने पुढील शिक्षणाची इच्छाही व्यक्त केली होती. याच वृत्ताची दखल घेऊन डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मातोश्री डॉ. कांचन देसरडा महाविद्यालयाने विशालच्या पदवी शिक्षणासाठी पुढाकार घेतला. या पुढाकाराने त्याला आता पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे.
‘दिव्य मराठी’चे खास आभार
घरातील हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला चौथीनंतर शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले होते. मात्र, ‘दिव्य मराठी’च्या वृत्तामुळे मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आयुष्यात पुन्हा शाळेत जायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, या दैनिकामुळे हे सर्व शक्य झाले. त्यामुळे मी ‘दिव्य मराठी’चा आभारी आहे,’ अशा शब्दांत विशाल मगरेने प्रतिक्रिया दिली.