आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया लय कायम ठेवणार!, आज भारत-श्रीलंका मालिकेतील चौथा वन डे सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - भारत आणि श्रीलंकेदरम्यान ऐतिहासिक ईडन गार्डनवर गुरुवारी मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना खेळवला जाईल. सुरुवातीचे तिन्ही वनडे जिंकून टीम इंडियाचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे. आता हीच विजयी लय कायम ठेवण्याच्या इराद्याने भारतीय खेळाडू मैदानावर उतरतील. आता ही वनडे मालिका ५-० ने जिंकण्याच्या रणनीतीसह टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार विराट कोहली खेळणार आहे.
रोहित करणार पुनरागमन
भारताकडून या सामन्यात रोहित शर्मा आणि रॉबिन उथप्पा यांना अंतिम अकरा खेळाडूंत संधी मिळू शकते. आठवड्यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध सराव सामन्यात रोहित शर्माने शतक ठोकले होते. या सामन्यात शिखर धवन आणि रवींद्र जडेजा खेळणार नाही. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे रॉबिन उथप्पाकडे स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असेल. तो या लढतीत यष्टिरक्षक-फलंदाज अशा दुहेरी भूमिकेत खेळू शकतो. रॉबिन उथप्पाने भारताकडून अखेरचा सामना जून महिन्यात बांगलादेशविरुद्ध खेळला होता. उथप्पाला ईडन गार्डनवर आयपीएलच्या माध्यमाने खेळण्याचा चांगला अनुभव आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स या विजेत्या संघाचा खेळाडू उथप्पाने केकेआरकडून १६ सामन्यांत ६६० धावा काढल्या होत्या. सलामीला रहाणे-रोहितच्या उपस्थितीमुळे उथप्पाला खालच्या क्रमांकावर खेळावे लागेल. टीम इंडियाची मधली फळी अत्यंत मजबूत आहे. मधल्या फळीत भारताकडे अंबाती रायडू, विराट कोहली, सुरेश रैना, केदार जाधव असे फलंदाज आहेत. या सामन्यात केदार जाधवला संधी मिळणे कठीण असते. मात्र, उथप्पा यष्टीरक्षक म्हणून खेळू शकतो.
दोन्ही संभाव्य संघ
भारत
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा (यष्टिरक्षक), सुरेश रैना, केदार जाधव, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कर्ण शर्मा, उमेश यादव, विनयकुमार.

श्रीलंका
अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, एस. प्रियंजन, महेला जयवर्धने, सी. डिसिल्वा, एल. गमागे, इरंगा, दिनेश चांदिमल, अजंता मेंिडस, लाहिरू थिरिमाने, तिसरा परेरा, नुवान कुलशेखरा.
भारतीय गोलंदाजी मजबूत...
भारताकडे गोलंदाजीत अक्षर पटेल, उमेश यादव, नवा चेहरा लेगस्पिनर कर्ण शर्मा, आर. विनयकुमार, ऑफस्पिनर आर. अश्विन यांच्यावर विजयी लय कायम ठेवण्याची जबाबदारी असेल. अक्षरने मालिकेत चांगली कामगिरी करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. त्याने १४.७१ च्या सरासरीने तीन सामन्यांत ७ गडी बाद केले आहे. उमेश यादवने ३ सामन्यांत ८ बळी घेतले आहेत.
श्रीलंका संघात बदल
दुसरीकडे श्रीलंकेने मालिका गमावली असली तरीही उर्वरित सामने जिंकून प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न पाहुणा संघ करेल. श्रीलंका क्रिकेट मंडळाने संघात चांगलेच बदल केले आहेत. सुरुवातीच्या सामन्यांतील अपयशामुळे धमिक्का प्रसाद, सूरज रणदीव, उपुल थरंगा व कुमार संगकारा यांना सुमार कामगिरीमुळे संघाबाहेर करण्यात आले आहे. त्यांच्या जागी इरंगा, अजंता मेंडिस, लाहिरू थिरिमाने, दिनेश चांदिमल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंकेचा कसून सराव
तीन पराभवांनंतर निराश झालेल्या श्रीलंका संघाने उर्वरित दोन सामन्यांत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बुधवारी कसून सराव केला. मालिकेत सलामीवीर अनुभवी तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने यांना वगळले तर विजयासाठी संघर्ष करताना इतर खेळाडू दिसलेच नाहीत. भारतीय खेळपट्ट्यांवर ३०० पेक्षा अधिकचा स्कोअर आवश्यक आहे, असे कर्णधार मॅथ्यूजने मान्य केले आहे. लंकेला सुमार फलंदाजीचा फटका बसला आहे. संघात बदल केल्यामुळे उर्वरित लढतीत तुल्यबळ संघर्ष दिसू शकतो.