आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथी कसोटी : ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी,इंग्लंडचा संघ 179 धांवावर गुंडाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियोनने (5/50) चमकदार कामगिरी केली. त्याने करिअरमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करताना इंग्लंडला दुस-या डावात 179 धावांत गुंडाळले. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल जॉन्सननेही तीन गडी बाद केले. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी आहे. विजयासाठी मिळालेल्या 231 धावांच्या प्रत्युत्तरात कांगारूंनी दमदार सुरुवात केली. या टीमने शनिवारी तिस-या दिवसअखेर बिनबाद 30 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाचे क्रिस रॉजर्स 18 आणि डेव्हिड वॉर्नर 12 धावांवर खेळत आहेत.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 204 धावा काढल्या. या टीमने सकाळी 9 बाद 164 धावांवरून तिस-या दिवशी खेळायला सुरुवात केली. हॅडिन 65 धावा काढून तंबूत परतला. इंग्लंडकडून गोलंदाजीत अँडरसनने चार गडी बाद केले. स्टुअर्ट ब्रॉडने तीन आणि टीम ब्रेसनने दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : पहिला डाव-225, दुसरा डाव : 179, ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : 204, दुसरा डाव : बिनबाद 30
लियोनचे बळींचे शतक
ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लियोनने चौथ्या कसोटीत पाच विकेट घेतल्या. यासह त्याने 100 बळींचा पल्ला यशस्वीपणे गाठला. त्याने करिअरमधील 29 व्या कसोटीत ही उल्लेखनीय कामगिरी केली.
कुकच्या आठ हजार धावा
इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुकने दुस-या डावात सर्वाधिक 51 धावा काढल्या. यासह त्याने कसोटी करिअरमध्ये 8 हजार धावा पूर्ण केल्या. कसोटीत आठ हजार धावांचा पल्ला गाठणारा 29 वर्षीय कुक हा सर्वात युवा फलंदाज ठरला. कुकचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर इंग्लंड टीमने एका धावेसाठी तीन विकेट गमावल्या.