आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेल नदालने आठव्यांदा जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - आपणच क्ले कोर्टचा बादशहा असल्याचे स्पेनच्या राफेल नदालने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये आपल्याच देशाच्या डेव्हिड फेररला 6-3, 6-2, 6-3 ने पराभूत करून नदालने नवा विक्रम घडवला. रोलँड गॅरोसच्या लाल मातीवर नदालचे हे विक्रमी आठवे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. कोणतीही एक ग्रँडस्लॅम आठ वेळा जिंकणारा नदाल जगातला पहिला खेळाडू ठरला आहे. आता त्याच्या नावे कारकीर्दीत पुरुष एकेरीचे 12 ग्रँडस्लॅम झाले आहेत.


सलग सात किताब जिंकले नदालने
12 वेळेसचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदाल मागच्या वर्षी वम्बल्डनमध्ये लवकर स्पर्धेबाहेर झाल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत दुखापतीमुळे कोर्टपासून दूर झाला होता. मात्र, त्याने धडाक्यात पुनरागमन केले. पुनरागमन केल्यानंतर त्याने एकापाठोपाठ सलग सात विजेतेपदे जिंकून आपल्यात अजूनही ‘दम’ असल्याचे सिद्ध केले. फेरर नदालचे आव्हान पेलू शकला नाही.


20 वेळा नदाल फेररला वरचढ
फेरर आणि नदाल यांच्यात आतापर्यंत 24 सामने झाले. यात फेररने नदालविरुद्ध तब्बल 20 सामने गमावले आहेत. नदालविरुद्ध त्याला फक्त चार लढतीत विजय मिळवता आला. क्ले कोर्टवर मागच्या 17 सामन्यांत राफेल नदालने डेव्हिड फेररला हरवण्याचा पराक्रम केला.


नदालने असा मिळवला विजय
तिसरा मानांकित स्पेनचा राफेल नदाल आणि चौथा मानांकित त्याच्याच देशाचा डेव्हिड फेरर यांच्यात रंगतदार सामना होण्याची शक्यता होती. मात्र, नदालने एकतर्फी लढतीत सहज विजय मिळवला. नदालने तीन सेटमध्ये 6-3, 6-2, 6-3 ने बाजी मारली. या सामन्यात नदालने तब्बल 5 ऐस मारले तर फेररला फक्त एकच ऐस मारता आला. राफाने 35 विनर्स मारुन प्रेक्षकांची मने जिंकली. नदालच्या तुलनेत फेररला फक्त 22 विनर्स मारता आली. नदालच्या तुलनेत फेररला स्वत:च्याच चुका भोवल्या. त्याने सामन्यात 5 डबल फॉल्ट आणि 35 साध्या चुका केल्या. नदालने 13 आणि फेररने 10 नेट पॉईट मिळवले. ब्रेक पॉईंटमध्ये नदालने 8 तर फेररने फक्त 3 गुण मिळवले.


59 सामन्यांत फक्त एक पराभव
रोलँड गॅरोसच्या लाल मातीवर 59 सामन्यांत नदालचा फक्त एक पराभव झाला आहे. 2009 मध्ये त्याला रॉबिन सोडरलिंगने पराभूत केले होते. हा एकमेव पराभव त्याच्या नावे येथे आहे. मागच्या वर्षी त्याने येथे सर्बियाच्या नोवाक योकोविकला पराभूत करून सातवे विजेतेपद जिंकले होते. 2002 नंतर प्रथमच फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये स्पेनचे दोन खेळाडू समोरासमोर होते.


नदालचे ग्रँडस्लॅम करिअर
फ्रेंच ओपन 2005,2006, 2007,2008,
2010, 2011, 2012, 2013
अमेरिकन ओपन 2010
ऑस्ट्रेलियन ओपन 2009
विम्बल्डन 2008, 2010