आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • French Open Tenis: Marria Sharapova, Azarenka Won, Peas Defeat

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा: मारिया शारापोवा, अझारेंका विजयी; पेसचा पराभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - दुसरी मानांकित मारिया शारापोवा व तिसरी मानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाने शनिवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेल्या शारापोवाने चीनच्या जाई झेंगला धूळ चारली. तिने तिस-या फेरीच्या लढतीत 6-1, 7-5 अशा फरकाने विजय मिळवला. रशियाच्या खेळाडूने एक तास 45 मिनिटांमध्ये बाजी मारली. चौथ्या फेरीत शारापोवाची गाठ अमेरिकेच्या स्लोएन स्टीफनशी पडणार आहे. 17 व्या मानांकित स्टीफनने न्यूझीलंडच्या मेरिना इराकोविकला 6-4, 6-7, 6-3 ने पराभूत केले.


दुसरीकडे पुरुष गटात 13 व्या मानांकित केई निशिकोरीने अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या बेनोईट पेयरेचा 6-3, 6-7, 6-4, 6-1 ने पराभव केला. जपानच्या निशिकोरीला दुस-या सेटमध्ये अपयशाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्याने दमदार पुनरागमन करत पुढील दोन्ही सेट जिंकले.


दुहेरीत पेसचा पराभव
भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसला पुरुष दुहेरीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. पेस-जुर्गेन मेल्झर या नवव्या मानांकित जोडीला पाब्लो क्युवास व होरासियोने पराभूत केले. या जोडीने 7-5, 4-6, 7-6 ने विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये पेस-मेल्झरला अपयशाला सामोरे जावे लागले. यातून सावरत या जोडीने दुसरा सेट आपल्या नावे केला. मात्र, तिस-या सेटमध्ये पाब्लो-होरासियोने बाजी मारली.


मिश्र दुहेरीत पेसला संधी
पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता पेसला मिश्र दुहेरीत खेळण्याची संधी आहे. मिश्र दुहेरीत तो सर्बियाच्या जेलेना यांकोविकसोबत खेळणार आहे. पहिल्या फेरीत या जोडीसमोर कजाकिस्तानच्या गेलिना वोस्कोबोए व डॅनियल ब्रासिएलीचे तगडे आव्हान असेल.


तीन सेटमध्ये अझारेंका विजयी
बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने फ्रान्सच्या अलाइज कार्नेटला तीन सेटमध्ये 4-6, 6-3, 6-1 अशा फरकाने धूळ चारली. पहिला सेट हरल्यानंतर तिस-या मानांकित खेळाडूने दमदार पुनरागमन केले. तिने सलग दोन सेट जिंकून सामना आपल्या नावे केला. आता चौथ्या फेरीत तिचा सामना फ्रान्सिस्का शियावोनसोबत होईल. माजी चॅम्पियन शियावोनने फ्रान्सच्या मारियन बार्टोलीचा पराभव केला. तिने 6-2, 6-1 ने विजय मिळवला.