कान्नूर - महाराष्ट्र आणि यजमान केरळ यांच्यातील रणजी सामन्याला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. कान्नूर येथे हा सामना रंगणार आहे.रोहित मोटवाणीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गत सामन्यात जम्मू-काश्मीरला 9 गड्यांनी धूळ चारली. याने आत्मविश्वास दुणावलेल्या महाराष्ट्र टीमचा केरळविरुद्ध सामन्यात विजयी लय अबाधित ठेवण्याचा प्रयत्न असेल. या सामन्यात औरंगाबादच्या अंकित बावणेसह हर्षद खडीवालेवर सर्वांची नजर असेल.
महाराष्ट्राचे गोलंदाज समद फल्लाहसह श्रीकांत मुंढे आणि दरेकरदेखील जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यामुळे यजमान केरळला घरच्या मैदानावर धूळ चारण्याचा पाहुण्या टीमचा प्रयत्न असेल. पाचपैकी तीन सामन्यांत विजयी पताका फडकावणारा महाराष्ट्र संघ क गटाच्या गुणतालिकेत दुस-या स्थानी आहे. या टीमचे एकूण 19 गुण आहेत. तसेच 23 गुणांसह हिमाचल प्रदेश टीम या गटात अव्वलस्थानी आहे. दुसरीकडे 18 गुणांसह केरळ टीम चौथ्या स्थानी आहे. या टीमला आतापर्यंत केवळ दोन सामन्यांत विजय मिळवता आला.
मुंबई-ओडिशा सामना रंगणार
ओडिशाचा सामना तगड्या मुंबई टीमशी होणार आहे. मुंबई टीम स्पर्धेत तीन सामन्यांतील विजयाने जबरदस्त फॉर्मात आहे. ही विजयी लय घरच्या मैदानावरही कायम ठेवण्याचा यजमान मुंबईचा प्रयत्न असेल.
विदर्भासमोर दिल्लीचे आव्हान
दिल्लीत पाहुण्या विदर्भासमोर यजमानांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अ गटात हा सामना रंगणार आहे. दिल्ली संघ 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. तसेच विदर्भ टीम सहाव्या क्रमांकावर आहे.