आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gagan Narang's Artical On Legend Sachin Tendulkar

सर्वांना अभिमान वाटावा, असा लिजेंड !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकर हा अतिशय मनमिळाऊ आणि सज्जन गृहस्थ आहे. तो अतिशय आदर्श मनुष्य आहे. तमाम भारतीयांना अभिमान वाटावा, असा लिजेंड आहे. क्रिकेटच्या मैदानावर त्याने सर्व काही मिळवले आहे. त्याने काढलेली प्रत्येक धाव एक विक्रम ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्रिकेट विश्वातील जवळपास सर्वच विक्रम आज या महान खेळाडूच्या नावे आहे. असा खेळाडू युगात पुन्हा होणे नाही. यासम हाच.
ज्या ज्या वेळी त्याच्यावर टीका झाली त्या वेळी त्याने बॅट आणि पॅड बांधून सर्वांना दमदार उत्तर दिले. शब्दाने नव्हेतर प्रत्येक वेळी केवळ आपल्या कामगिरीने. एकदिवसीय सामन्यात वैयक्तिक 200 धावांचे एव्हरेस्ट उभे केले. अवघ्या क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करुन त्याने आपल्या महानतेचा कळसच गाठला.किती मोठा हा कीर्तिमान! त्याची स्तुती करावी तेवढी कमीच. तो भारतीय आहे याचा जास्त अभिमान आहे. माझी आणि सचिनची एकदाच भेट झाली. राष्‍ट्रकुल स्पर्धेनंतर ‘सहारा’कडून आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात सचिन तो आला होता. तो अतिशय मनमिळाऊ, नम्र आणि मृदू स्वभावाचा असल्याची प्रचिती याप्रसंगी आली.
सचिनची भेट अवर्णनीय होती. अख्ख्या भारतातील टीव्ही संच सचिनच्या कामगिरीवर चालू-बंद होत असल्याचे आपण सर्वांनी अनुभवले आहे. असा महान खेळाडू आम्हाला भेटतोय यावर विश्वास बसत नव्हता. राष्‍ट्रकुल स्पर्धेत चांगली कामगिरी करून तु देशाचे नाव मोठे केले आहेस, असे तो मला म्हणाला. त्याच्या या शब्दांमुळे माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. गगन तुझ्याकडून भविष्यातही देशासाठी अशीच नव्हे तर, किंबहुना यापेक्षा अधिक चांगली कामगिरी व्हावी, अशा शब्दांत त्याने मला शुभेच्छा दिली. तो खूप ग्रेट आहे.
सचिन ज्या ज्या वेळी मैदानावर खेळला त्या त्या वेळी त्याच्या नजरेत, देहबोलीत एक सकारात्मक विचार धावत असल्याचे दिसून आले. तो काही तरी वेगळे करण्याच्या निश्चयानेच
नेहमी मैदानावर उरतला. फक्त निश्चय करून सचिन थांबत नाही, तर ठरलेल्या लक्ष्याचा पाठलाग
करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तो थांबत नाही. सतत प्रयत्न आणि केवळ प्रयत्न करीत राहतो आणि हेच तर त्याच्याकडून प्रत्येकाने शिकण्यासारखे आहे. एखाद्या खेळाडूने खेळात किती समर्पण द्यावे, असे कोणी विचारले तर त्याचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे सचिन तेंडुलकर. इतरांच्या तुलनेत सचिन खूप अधिक उजवा खेळाडू आहे.
सचिन कोट्यवधी भारतीयांच्या, चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन गेली 24 वर्षे सलगपणे खेळला. पुढच्या पिढीला पावलोपावली अभिमान वाटावा अशी कामगिरी त्याने केली आहे. खेळाप्रती किती प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहायला हवे हे मी सचिनकडून शिकलो. त्याच्या समर्पणाला, निष्ठेला तोडच नाही. ‘महान’ या शब्दाला एकच पर्याय आहे...तो म्हणजे ‘सचिन तेंडुलकर.’!!!
शब्दांकन : विवेक राठोड