आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर टीम इंडियातून ‘आऊट’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - फॉर्मात नसलेला सलामीवीर गौतम गंभीरची टीम इंडियातून हकालपट्टी झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन कसोटीसाठी घोषित करण्यात आलेल्या संघातून त्याला वगळण्याचा निर्णय रविवारी निवड समितीने घेतला. ऑफ स्पिनर हरभजनसिंगने संघात पुनरागमन केले. डावखुरा सलामीवीर शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वरकुमार हे संघातील नवे चेहरे आहेत. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत 22 फेब्रुवारीपासून चेन्नईत खेळवली जाईल.

संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने दोन तास चाललेल्या बैठकीनंतर संघ निवड केली. बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी संघाची घोषणा केली. इंग्लंडविरुद्ध नागपूर येथे खेळणा-या टीम इंडियात तीन बदल करण्यात आले. गौतम गंभीर, परविंदर अवाना आणि पीयूष चावला यांना संघाबाहेर करण्यात आले. त्यांच्या जागी शिखर धवन, हरभजनसिंग आणि भुवनेश्वरकुमार यांना संधी देण्यात आली.

गंभीरप्रमाणे फ्लॉप ठरत असलेल्या सेहवागवर मात्र निवड समितीने भरवसा ठेवला आहे. दुसरीकडे इराणी ट्रॉफीत शतक ठोकल्यानंतर सुद्धा सुरेश रैनाला संधी मिळाली नाही.

प्रदर्शन नव्हे, रेकॉर्डने दिली संधी
ऑफ स्पिनर हरभजनसिंगला मागच्या सहा प्रथम श्रेणी सामन्यात अवघ्या 21 विकेट घेता आल्या. त्याच्या दर्जाच्या नुसार हे प्रदर्शन तसे समाधानकारक नाही. याचाच अर्थ मागच्या रेकॉर्डच्या बळावर त्याला टीम इंडियात संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात झालेल्या 12 कसोटीत त्याच्या नावावर 81 बळी आहेत. जुन्या रेकॉर्डमुळेच त्याला संधी मिळाली. असे नसते तर आर. अश्विन, प्रज्ञान ओझा आणि रवींद्र जडेजा असे तीन फिरकीपटू संघात असताना त्याला संधी देण्याचे काहीच कारण नव्हते.

टीम इंडिया : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सहवाग, शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, हरभजनसिंग, इशांत शर्मा, भुवनेश्वरकुमार, आर. अश्विन, प्रज्ञान ओझा, अशोक डिंडा.

मालिकेचा कार्यक्रम असा
कसोटी दिनांक स्थळ
पहिली कसोटी 22 फेब्रु. चेपॉक, चेन्नई
दुसरी कसोटी 2 मार्च उप्पल, हैदराबाद
तिसरी कसोटी 14 मार्च मोहली, चंदिगड
चौथी कसोटी 22 मार्च नवी दिल्ली

वनडेतील अपयश गंभीरला भोवले
गौतम गंभीरने मागच्या चार कसोटी डावात 65, 60, 40 आणि 37 धावा काढल्या होत्या. मात्र, पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतील अपयश त्याला भोवले. मागच्या आठ वनडे सामन्यात त्याला एक सुद्धा अर्धशतक काढता आले नाही. असे असले तरीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत अ संघाचे नेतृत्व सोपवून गंभीरला संघात पुनरागमनाची संधी निवड समितीने दिली आहे.मागच्या तीन वर्षांत गंभीरला कसोटीत एकही शतक ठोकता आले नाही. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड दौ-यातील मालिकेत त्यांचे अपयश ठळकपणे दिसून आले होते.

ऑस्ट्रेलियाचा हरभजन कर्दनकाळ
ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरभजन हमखास यशस्वी ठरतो हा आतापर्यंत इतिहास आहे. इराणी ट्रॉफीत त्याने 5, तर मागच्या 5 रणजी सामन्यांत 13 विकेट घेऊन फॉर्म परत मिळवला आहे. भज्जीला शंभरावी कसोटी खेळण्याची संधी मिळणार आहे.

इंग्लंडविरुद्ध चमकल्याचा फायदा
दिल्लीचा डावखुरा फलंदाज शिखर धवनने इराणी ट्रॉफीत अर्धशतक ठोकताना 63 धावा काढल्या. मात्र, यापूर्वी त्याने दिल्लीकडून खेळताना इंग्लंड इलेव्हनविरुद्ध 110 धावा ठोकल्या होत्या. या सामन्यात दिल्ली जिंकली होती.
संघात आले हरभजन, भुवनेश्वरकुमार, शिखर धवन.
संघाबाहेर गौतम गंभीर, पीयूष चावला, परविंदर अवाना.

यांचे नशीब दुर्दैवी
वसीम जाफर : जाफरने इराणी ट्रॉफीत 80, आणि 101* धावा तर मागच्या 8 सामन्यांत 1016 धावा काढल्या. यानंतरही त्याला संधी मिळाली नाही.
सुरेश रैना : इराणी ट्रॉफीत शतक आणि इंग्लंडविरुद्ध वनडेत मालिकवीर ठरूनही दुर्लक्ष झाले.

भुवनेश्वरला संधी
मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वरकुमारला वनडेत चांगली कामगिरी केल्याचे बक्षीस मिळाले आहे. त्याला कसोटी संघात प्रथमच संधी देण्यात आली आहे. त्याच्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. मागच्या काही सामन्यांत त्याने नव्या चेंडूने जितकी चांगली गोलंदाजी केली तशी कामगिरी तो जुन्या चेंडूने करू शकला नाही. कसोटीत मात्र जुन्या चेंडूचा खेळ मोठा असतो. यामुळे कसोटीत त्याची खरी कसोटी ठरेल.