मुंबई - सौरव गांगुलीच्या अॅथलेटिको डी कोलकाता संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. शनिवारी झालेल्या फायनलमध्ये कोलकाता संघाने सचिन तेंडुलकरचा संघ केरला ब्लास्टर्सला १-० ने हरवले. अत्यंत रोमांचक सामन्यात एकमेव गोल अखेरच्या मिनिटांत मोहंमद रफिकने केला.
डी. वाय. पाटील स्टेडियमवर रविवारी क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडूंचे संघ फुटबॉलच्या मैदानावर समोरासमोर होते. दोघांनी फुटबॉलचे विजेतेपद जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वि. बंगाल टायगर सौरव गांगुली असा हा सामना रंगला होता. बरोबरीच्या या सामन्यात एक्स्ट्रा टाइममध्ये लढत जाईल, असे वाटत होते. मात्र, बंगाल टायगर्सने चमत्कार केला. सामन्याच्या ९० व्या मिनिटाला पोडीने पोस्टजवळ अत्यंत शानदार पास केला. रफिकने या पासवर शानदार हेडर करून गोल केला. हा गोल होताच कोलकात्याच्या चाहत्यांनी आणि खेळाडूंनी एकच जल्लोष केला. खेळाडूंनी रफिकला हवेत उचलून जल्लोष केला. फायनल सुरू होण्यापूर्वी रंगारंग कार्यक्रमाने उपस्थित चाहत्यांचे मनोरंजन केले.
सचिन-गांगुलीचा पाठिंबा : सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी
आपापल्या संघातील खेळाडूंना जोरदार पाठिंबा दिला. हरभजनसिंग, लियांडर पेस हेसुद्धा हजर होते.
विजेत्या संघाला ८ कोटींचे बक्षीस
विजेता संघ अॅथलेटिको डी कोलकाताला ८ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. उपविजेता केरला ब्लास्टर्सला ४ कोटी रुपये मिळाले. सेमीफायनलमध्ये पराभूत होणारे संघ चेन्नईयन आणि गोवा एफसी संघाला प्रत्येकी दीड कोटी मिळाले. चेन्नईयनचा ब्राझीलचा खेळाडू इलानो ब्लुमरला "गोल्डन बूट'चा पुरस्कार मिळाला.