आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीच्या वेटलचा ऐतिहासिक विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँस्टिन - चार वेळचा वर्ल्ड चॅम्पियन सेबेस्टियन वेटलने सोमवारी अमेरिकन ग्रांप्री फॉर्म्युला-1 शर्यत जिंकून माजी स्टार खेळाडू मायकेल शूमाकरचा विक्रम मोडला आहे. वेटलने या सत्रात सलग आठवी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिला फॉर्म्युला वन ड्रायव्हर ठरला आहे.
मायकेल शूमाकरला टाकले मागे
एका सत्रात सर्वाधिक सलग सात स्पर्धा जिंकण्याचा विश्वविक्रम यापूर्वी मायकेल शूमाकरच्या नावे होता. वेटलने अमेरिकन ग्रांप्री जिंकून शूमाकरचा हा विक्रम इतिहासजमा केला. शूमाकरने ही कामगिरी 2004 च्या सत्रात केली होती.
रेड बुलचा ड्रायव्हर वेटलने या सत्रात सलग आठ आणि एकूण 12 स्पर्धा जिंकल्या आहेत. एफ-1 करिअरमधील ही 38 वी विजयी ट्रॉफी ठरली. र्जमनीच्या 26 वर्षीय वेटलने पोल पोझिशनवरून रेसला सुरुवात केली. त्याने 1:39:17.148 सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण केले. त्याने फ्रान्सचा ड्रायव्हर रोमन ग्रोजिया आणि आपला टीम सहकारी मार्क वेबरला पिछाडीवर टाकून अव्वल स्थान गाठले. ग्रोजियाला दुसर्‍या आणि वेबरला तिसर्‍या स्थानी समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या र्मसिडीझचा लुईस हॅमिल्टन चौथ्या आणि स्पेनचा फर्नांडो अलोन्सो पाचव्या स्थानी राहिला. फोर्स इंडियाच्या पॉल डी रेस्टाला निराशाजनक कामगिरीचा मोठा फटका बसला. त्याला रेसच्या अव्वल दहामध्येही स्थान मिळवता आले नाही. त्याला 15 व्या स्थानी समाधान मानावे लागले.
अमेरिकेत जिंकली पहिली ट्रॉफी
रेड बुलच्या सेबेस्टियन वेटलला अमेरिकन ट्रॅकवर विजय मिळवण्यात पहिल्यांदा यश आले. यापूर्वी तो येथे काही स्पर्धांत अपयशी ठरला होता. वेटलला हंगेरी येथील एफ-1 ट्रॅकवर त्याला अद्याप एकदाही रेस जिंकता आली नाही. वेटलच्या पराक्रमाने वेगाच्या शर्यतीत नवा हिरो उदयास आला आहे.
सहारा फोर्स इंडिया अपयशी
अमेरिकी ग्रांप्री फॉर्म्युला वन स्पर्धेत सहारा फोर्स इंडियाची टीम साफ अपयशी ठरली. संघाला एकही गुण मिळवता आला नाही. अँड्रियन सुतील पहिल्याच फेरीत गारद झाला. त्याचा संघ सहकारी पॉल डी रेस्टाला पंधराव्या स्थानी समाधान मानावे लागले. सुतीलच्या गाडीला अपघात झाल्यामुळे त्याची संधी हुकली. रेस्टाने सुरुवात चांगली केली होती. मात्र, ही लय त्याला कायम राखता आली नाही. शेवटी त्याला आघाडीच्या दहामध्येही स्थान मिळाले नाही. र्जमनीच्या सेबेस्टियन वेटलने ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.
सलग विक्रमी आठ विजय
प्रथम 25 ऑगस्ट बेल्जियम ग्रांप्री
प्रथम 8 सप्टेंबर इटालियन ग्रांप्री
प्रथम 22 सप्टेंबर सिंगापूर ग्रांप्री
प्रथम 6 ऑक्टोबर द. कोरिया ग्रांप्री
प्रथम 13 ऑक्टोबर जपान ग्रांप्री
प्रथम 27 ऑक्टोबर इंडियन ग्रांप्री
प्रथम 3 नोव्हेंबर अबुधाबी ग्रांप्री
प्रथम 17 नोव्हेंबर अमेरिकन ग्रांप्री
चौथ्यांदा चॅम्पियनशिप जिंकली
रेड बुलच्या सेबेस्टियन वेटलने सलग चौथ्यांदा चॅम्पियनशिप आपल्या नावे केली. त्याने यापूर्वी 2010, 2011, 2012 मध्ये ही चॅम्पियनशिप जिंकली होती.
ब्राझील ग्रांप्रीचे लक्ष्य
रेड बुलच्या सेबेस्टिन वेटलला एकाच सत्रात सर्वाधिक 13 रेस जिंकून शूमाकरच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी आहे. यासाठी त्याला ब्राझील ग्रांप्री फॉर्म्युला-1 रेस जिंकणे आवश्यक आहे. ही रेस 24 नोव्हेंबरला साओ पाओलो येथे होणार आहे. वेटलने आतापर्यंत या सत्रात एकूण 12 रेस जिंकल्या आहेत.