आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनी चॅम्पियन; यजमान भारत चौथ्या स्थानावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: भारताविरुद्ध उपांत्य सामन्यातील विजयानंतर अश्लील हावभाव करताना पाकचे खेळाडू.
भुवनेश्वर - हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जर्मनीचा संघ रविवारी चॅम्पियन ठरला. या संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा २-० ने पराभव केला. यासह जर्मनीने दहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान पटकावला. भारताला नमवणारा पाक संघ उपविजेता ठरला.

आशियाई चॅम्पियन भारतीय संघाचे हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कांस्यपदक हुकले. तिस-या स्थानासाठी झालेल्या लढतीत यजमान भारताला गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने २-१ ने धूळ चारली. ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून कांस्यपदकावर नाव कोरले. गोहडेसने ५२ व्या मिनिटाला गोल करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. तसेच ओकेडेनने (१८ मि.) विजयात एका गोलचे योगदान दिले. भारताकडून घरच्या मैदानावर ललित उपाध्यायने (४२ मि.) एकमेव गोल केला. भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला. उपांत्य लढतीत भारताला पाकने पराभूत केले होते.

जर्मनीचा २-० ने विजय
जर्मनी संघाने जेतेपदासाठी झालेल्या अंतिम सामन्यात २-० अशा फरकाने विजय मिळवला. यासह जर्मनीने तब्बल सात वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकली. वेस्ली (१५ मि.) आणि फुच (५८ मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर जर्मनी संघाने सामना जिंकला. दरम्यान, विजयासाठी झुंज देणा-या पाकिस्तानचे स्टार खेळाडू सामन्यात शेवटच्या मिनिटांपर्यंत सपशेल अपयशी ठरले. त्यांना गोलचे खाते उघडता आले नाही.

पाकचे ‘ते’ दोन खेळाडू निलंबित
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य लढतीत भारतावर विजय मिळवल्यानंतर अश्लील हावभाव करणारे पाकिस्तान संघातील खेळाडू अमजद अली आणि मोहंमद तौशिकला चांगलेच महागात पडले. या दोघांवरही अशा प्रकारच्या गैरवर्तनप्रकरणी एफआयएचने निलंबनाचा बडगा उगारला. आता या दोघांनाही आगामी एका सामन्यापर्यंत पाक संघाकडून खेळता येणार नाही. शनिवारी यजमान भारतावर मात केल्यानंतर पाकच्या खेळाडूंनी विजयी जल्लोष केला. मात्र, यादरम्यान त्या दाेन खेळाडूंनी गैरवर्तन केले. याची तक्रार भारताने एफआयएचकडे केली होती. त्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.